भारतीय नागरिकांना मोजावे लागतायत पैसे, शत्रू असणाऱ्या पाकिस्तानला मात्र मोफत लस – नाना पटोले
पुणे : महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात कोरोनाने पुन्हा एकदा कहर घातला आहे. मागील वेळेपेक्षा ही लाट अधिक गंभीर असल्याने रुग्णालयांमध्ये बेड्स, ऑक्सिजन, रेमडेसिवीर व इतर औषधांचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. देशात दररोज विक्रमी कोरोनाबाधितांची नोंद होत असून संसर्गाला आळा घालण्यासाठी कोरोना प्रतिबंधक लसीकरण होणे गरजेचं आहे.
अनेक ठिकाणी लसींचा तुटवडा निर्माण होत असून आता सीरम इन्स्टिट्यूटच्या ‘कोव्हीशील्ड’ या लसीच्या किंमतीमध्ये वाढ करण्यात आली आहे. यामुळे सामान्यांना लस घेण्यात आर्थिक अडचण निर्माण होण्याची भीती असल्याने काँग्रेसने दरवाढीचा निषेध करत मोफत लस उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज पुण्यात पत्रकार परिषद घेत केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. केवळ केंद्र सरकारच्या चुकीच्या नियोजनामुळं ऑक्सिजन आणि रेमडेसिविरचा तुटवडा निर्माण झाला असून त्याचा काळाबाजार होत असल्याचा आरोप पटोलेंनी केला आहे. तसंच ‘केंद्र सरकार एकीकडं भारताचा शत्रू अशी ओळख असलेल्या पाकिस्तानला मोफत लस देत आहे. मात्र देशातील नागरिकांना त्यासाठी पैसे मोजायला सांगत आहे. देशाला लस मोफत का देत नाही,’ असा सवालही त्यांनी केला.
कोरोनाची एकूणच परिस्थिती आणि प्रामुख्यानं लसीच्या मुद्द्यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज पत्रकार परिषद घेतली. कोरोनाची लस पुण्यात तयार होते, त्यामुळं पुण्यात पत्रकार परिषद घेत असल्याचं पटोले म्हणाले. केंद्र सरकारला लस १५० रुपयांना द्यायची आणि तीच राज्यांना ४०० रुपयांना या मुद्द्यावर त्यांनी आक्षेप घेतला. या मुद्द्यावर आंदोलन करणार होतो, पण कोरोनाच्या परिस्थितीमुळं आंदोलन टाळल्याचं पटोले म्हणाले.
केंद्र सरकारनं फक्त दोनच कंपन्यांना लस निर्मितीची परवानगी दिली. त्यामुळं यामध्ये या कंपन्यांची मक्तेदारी निर्माण झाली आहे. आता नागरिकांना लस पुरवणं ही केंद्राची जबाबदारी आहे, असंही पटोले म्हणाले.
पुनावाला हे कुणाचे मित्र आहेत, या भानगडीत मला पडायचे नाही. सरकारनं नागरिकांसाठी मोफत लस उपलब्ध करून द्यावी अशी मागणी पटोले यांनी केली. तसंच लसीच्या पुरवठ्यामध्ये निर्माण होणारा तुटवडा यामागं नफेखोरीचा प्रकार अशल्याचा संशयदेखील पटोले यांनी व्यक्त केला.
भारतातील वॅक्सीन उत्पादक कंपन्यांकडून होणारा व्यापार थांबवण्याबाबत तसेच देशामध्ये लसीकरण हे केंद्र सरकारने मोफत करावे या मागणी साठी कॉंग्रेस पक्षा तर्फे पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. pic.twitter.com/1qqbQ6OTQL
— Nana Patole (@NANA_PATOLE) April 24, 2021