सचिन वाझेंच्या कोठडीत वाढ; ७ एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी
मुंबई: उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्फोटके भरलेले वाहन आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणी अटकेत असणारे सचिन वाझे यांच्या पोलीस कोठडीत ७ एप्रिल पर्यंत वाढ करण्यात आली आहे. मिठी नदीतून सापडलेला सीसीटीव्ही डेटा आणि वाझे यांचा पासपोर्ट बाबत तपासणी करायची असल्याने पोलीस कोठडी वाढवून मिळावी अशी मागणी न्यायालयात करण्यात आली होती.
सचिन वाझे गेल्या २२ दिवसांपासून एनआयएच्या कोठडीत आहेत. सचिन वाझे यांची पोलीस कोठडी संपत असल्याने त्यांना NIA च्या विशेष न्यायालयात हजार करण्यात आले होते. यावेळी त्यांना ७ एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. एनआयएनं ताब्यात घेतल्यानंतर वाझेंनी छातीत दुखत असल्याची तक्रार केली होती. त्यानंतर जे. जे. रुग्णालयात त्यांची तपासणी करण्यात आली होती. नंतरच्या चौकशी दरम्यान वाझेंनी दोन-तीन वेळा प्रकृतीची तक्रार केली होती. तेव्हा त्यांच्या काही चाचण्या करण्यात आल्या होत्या. त्यांना मधुमेहाचा त्रास असल्याचंही समोर आलं होतं. त्यांना हृदयविकाराचाही त्रास असल्याची माहिती त्यांच्या वकिलांनी अर्जाद्वारे न्यायालयाला दिली होती. या सगळ्यानंतर न्यायालयानं वाझेंचा वैद्यकीय अहवाल मागवला.
सीसीटीव्ही फुटेजचा १२० जीबी डाटा NIA कडे आहे. या फुटेज मधून सर्व काही स्पष्ट होईल असा दावा सचिन वाझे यांच्या वकिलानी न्यायालयात केला. या फुटेजमध्ये कोणीही छेडछाड करू शकत नाही असा दावाही त्यांनी न्यायालयात केला.
मनसुख हिरेन हत्या प्रकरणाचा तपास देखील एनआयए करत असत असून त्या प्रकरणी देखील सचिन वाझेंची चौकशी सुरू आहे. या तपासात अनेक खुलासे झाल्याचं एनआयएकडून सांगण्यात आलं आहे.