मार्च महिन्यात राज्यात १० ते २० वयोगटातील ५५ हजार मुलांना कोरोना!

मुंबई: राज्यात कोरोना बाधितांची वाढती संख्या चिंताजनक आहे. यातच पालकांची चिंता वाढविणारी माहिती समोर येत आहे. मार्च महिन्यात १० ते २० वर्ष या वयोगटातील तब्बल ५५ हजार मुलांना कोरोना झाल्याचे समोर आले आहे. तर महिन्यात एकून साडेसहा लाख कोरोना बाधित राज्यभरात आढळून आल्याची माहिती डॉ. तात्याराव लहानेनी दिली.
राज्यात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहे. नवीन स्ट्रेन मुळे रुग्णात मोठी वाढ होत आहे. नवीन स्ट्रेन मध्ये बाधित करण्याची क्षमता अधिक आहे. पहिल्या स्ट्रेनच्या बाधेमुळे चार ते पाच लोक बाधित होत होते. या नवीन स्ट्रेन मुळे १०पेक्षा अधिक लोक बाधित होत असल्याचे डॉ. तात्याराव लहाने यांनी सांगितले. याधी ५० वर्षावरील लोकांना कोरोनाची बाधा अधिक होत होती. आता मात्र २० ते ४० या वयोगटातील लोकांना बाधा अधिक होत आहे. त्याच बरोबर ५ ते २० वयोगटातील मुलांना सुद्धा कोरोना होत आहे. तर १० वर्षावरील मुलांना बाधा अधिक होत असल्याचे लहाने यांनी सांगितले.
जरी लहान मुलांना कोरोना होत असले तरीही घाबरण्याचे कारण नाही. पालकांनी काळजी घ्यावी असेही डॉ. लहाने यांनी सांगितले. सद्या लॉकडाऊन लावण्यात आला नाही तरी अजून कडक निर्बंध लावण्यात येतील. ही कोरोनाची दुसरी लाट आहे. यात रुग्णवाढ मोठ्या प्रमाणात होत असल्याचे डॉ. लहाने यांनी सांगितले.
नियम पाळले नाही तर लॉकडाऊन- आरोग्य मंत्री
पुन्हा एकदा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी नागरिकांनी नियम पाळले नाही तर लॉकडाऊन करण्याचे सुतोवाच केले आहे. नागरिकांनी गर्दी करू नये असे अहवाहन सुद्धा टोपे यांनी केले.