शेवटी राजकारण थोडं हलतडुलत राहिलं पाहिजे, लोकशाही आहे – संजय राऊत
मुंबई: राज्यात सध्या राजकीय वातावरण जरा जास्तच गरम आहे, सचिन वाझे, अनिल देशमुख, परमबीर सिंग आणि अजून एक घटना अशी घडली आहे की राजकीय चर्चेला परत उधाण आलेले आहे, कारण देशाचे गृहमंत्री अमित शहा, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या गुप्त भेट झाल्याच्या राजकीय चर्चा रंगल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी यावर प्रतिक्रीया दिली आहे.
“शरद पवार आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यात भेट झाली की नाही याची माहिती नाही. मात्र अमित शाह आणि शरद पवार यांच्या भेटीत चुकीचं काही नाही,” असं मत राऊत यांनी व्यक्त केले आहे. यासोबत “देशाच्या गृहमंत्र्यांना एखादा मोठा नेतो भेटतो यात चुकीचं काय आहे. आम्हाला वाटलं तर आम्ही देखील गृहमंत्र्यांना भेटू शकतो. त्यांची भेट कामानिमित्त भेट झाली असेल तर चुकीचं काहीच नाही, राजकारणात कोणतीही बैठक गुप्त नसते. अनेक गोष्टी सार्वजनिक केल्या जात नाहीत.मात्र नंतर त्या सार्वजिनिक होतात, जसं की बंद खोलीतील चर्चा असो, “असं म्हणत राऊतांनी अमित शहांना देखील जूनी आठवण करुन देत टोला लगावला.
‘महाविकास आघाडी सरकार स्थिर आहे. पूर्ण ताकदीनं काम करत आहे. या सरकारला अजिबात धोका नाही. टीका-टिप्पणी होत असते. शेवटी राजकारण थोडं हलतडुलत राहिलं पाहिजे, लोकशाही आहे,’ असंही राऊत यांनी स्पष्ट केलं.
शरद पवारांच्या प्रकृतीविषयी कालच सुप्रियाताईंकडून समजलं – संजय राऊत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांना अचानक पोटात दुखू लागल्याचं सांगितलं जात आहे. तसेच, शरद पवारांवर ३१ मार्च रोजी शस्त्रक्रिया होणार असल्याचं देखील समजत असल्यामुळे नेमकं पवारांना काय झालं आहे? याविषयी त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी शरद पवारांच्या प्रकृतीविषयी माहिती दिली आहे. “शरद पवारांच्या प्रकृतीविषयी कालच सुप्रियाताईंकडून समजलं होतं, त्याविषयी माझी मुख्यमंत्र्यांशी देखील चर्चा झाली होती. त्यांची प्रकृती थोडी नाजूक आहे”, असं संजय राऊत यांनी एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितलं