Tuesday, October 4, 2022
HomeZP ते मंत्रालयठाकरेंच्या सामनाला उत्तर म्हणून राणेंनी 'प्रहार'ची सुरुवात केली...

ठाकरेंच्या सामनाला उत्तर म्हणून राणेंनी ‘प्रहार’ची सुरुवात केली…

काल केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेत शिवसेनेसह उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. निमित्त होते, संजय राऊत यांनी घेतलेली उद्धव ठाकरे यांची मुलाखत.

अर्ध्या तासाच्या उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीवर राणेंनी तासभराच्या पत्रकार परिषदेतून टीकास्त्र डागले. यानंतर सर्व वृत्तवाहिन्यांवर एकच हेडलाईन सुरू झाली. राणेंचा ठाकरेंवर ‘प्रहार’.

जेव्हा जेव्हा राणे शिवसेना व ठाकरे घरावर टीका करतात, तेव्हा ‘राणेंचा ठाकरेंवर प्रहार’ अशी हेडलाईन चालवली जाते. वृत्तवाहिन्यांची टीवी स्क्रीन असो की वर्तमान पत्रातील रकाने ‘राणेंचा प्रहार’ हा शब्द प्रयोग हमखास वापरला जातो.

याचे कारण म्हणजे राणेंनी सुरु केलेले प्रहार दैनिक

प्रहार सुरु करण्यामागील भूमिका

राजकारणातील बेबंदशाही, अन्याय-अत्याचाराच्या विरोधात प्रखर आवाज आणि राजकीय भूमिका जनतेत नेण्यासाठी एप्रिलपासून आपण ‘प्रहार’ हे मराठी दैनिक सुरू करणार असल्याचे नारायण राणे यांनी ३० जानेवारी २००८ मध्ये सांगितले.

आपली बाजू समर्थपणे मांडायची. कोणाच्या दबावाखाली बातम्या मागे घ्यायच्या नाहीत. सर्वसामान्यांच्या प्रश्नांना न्याय द्यायचा. चांगल्या विचारांचे प्रबोधन करायचे हे ‘प्रहार’चे काम राहील, असेही त्यांनी सांगितले.

पुढे ९ ऑक्टोबर २००८ मध्ये प्रहार दैनिक सुरु झाले. विशेष म्हणजे वर्तमानपत्राच्या नावाप्रमाणेच टॅगलाईन देण्यात आली, ‘शब्दांना सत्याची धार’!

स्वतंत्र दैनिक सुरु होताच राणेंनी आपल्या विरोधकांवर ‘प्रहार’ सुरु केला. सामनातून होणाऱ्या टीकेला प्रत्युत्तर द्यायला सुरुवात झाली आणि राजकीय विरोधकांचा ‘सामना’ प्रहारमधून केला जाऊ लागला.

‘राणेंचा प्रहार’ हा शब्दप्रयोग महाराष्ट्रातील पत्रकारितेत रूढ झाला

२००५ मध्ये शिवसेनेतून कॉंग्रेसमध्ये बाहेर पडल्यानंतर राणेंवर जळजळीत टीका व्हायची. बाळासाहेब पाठीशी असल्याने संजय राऊत राणेंवर टीका करण्याची संधी सोडत नसल्याचे बोलले जाते.

सामनाची भाषा किंवा सामनातून विरोधकांवर होणारी टीका हा मुद्दा सर्वश्रुत आहे. त्यामुळे राणेंवर देखील अशीच टीका व्हायची. आताही होते. मात्र, ते कॉंग्रेसमध्ये गेल्यानंतर सामनाने त्यांच्याविरोधात मोर्चा खोलला होता.

सामनातून राणेंवर टीका होताच प्रहार मधून सामनाच्या टीकेला प्रत्युत्तर दिले जायचे. त्यामुळेच ‘राणेंचा ठाकरेंवर प्रहार’ हा शब्दप्रयोग महाराष्ट्रातील पत्रकारितेत रूढ झाला. म्हणूनच राणेंनी कुणावरही टीका केली तरी ‘राणेंचा प्रहार’ अशीच ह्डलाईन छापली जाते.

‘प्रहार’ या नावासाठी खास अट्टहास

राजकारण्यांना वृत्तपत्र हाताशी असावे वाटते. त्याप्रमाणे ते वर्तमानपत्र सुरु करतात. शिवसेना सामनाला शास्त्राप्रमाणे वापरत असल्याचे लक्षात घेऊनच राणेंनी देखील वर्तमानपत्र सुरु केले असल्याचे एक जेष्ठ पत्रकार सांगतात.

आपल्या दैनिकाला प्रहार हेच नाव मिळावे, याकरिता राणे आग्रही होते. त्यासाठी त्यांनी दोन वर्षे प्रयत्न केले. हे शीर्षक त्यांनी अमरावतीच्या रामबिसान गुल्हाणी यांच्याकडून ‘राणे प्रकाशन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने विकत घेतले.

सामनाला प्रत्युत्तर देण्यासाठी राणेंना वर्तमानपत्र काढायचे होते, म्हणूनच त्यांनी प्रहार’ असे नाव दिले होते, असेही बोलले जाते.

सामना विरुद्ध प्रहार

बाळासाहेबांवर टीका केली म्हणून वर्तमानपात्रांच्या कार्यालयाची तोडफोड, पत्रकारांना मारहाण असे प्रकार नेहमीच शिवसैनिकांकडून व्हायचे. हाच कित्ता एकदा पुण्यातील राणे समर्थकांनी गिरवला होता. सामनातून टीका केली म्हणून राणे समर्थकांनी पुण्यातील सिंहगड रोड परिसरातील सामनाच्या छापखान्याची तोडोफोड केली होती.

पण राणेंनी वर्तमानपत्राला वर्तमानपत्रातूनच उत्तर दिले. शिवसेना विरुद्ध राणे ही रस्त्यावरची लढाई महाराष्ट्राला ज्ञात आहे. या लढाईत सामना आणि प्रहार या वर्तमानपत्रांनी अधिकच भर घातली.

राणेंनी वर्तमानपत्र सुरु करताचा सामना विरुद्ध प्रहार अशी लढाई पत्रकारितेत पाहायला मिळणार, असा अंदाज वर्तवला जायचा. या अंदाजाप्रमाणे दोन्ही वर्तमानपत्र आमनेसामने यायचे देखील. प्रहार सुरु झाल्यानंतर काही काळ प्रहारची बरीच चर्चा झाली.

मात्र, राणेंवरील टीकेला जशास तसे प्रत्युत्तर देणे, इथपर्यंतच प्रहारचे कार्य मर्यादित नाही. एक चांगले वर्तमानपत्र म्हणून प्रहारने अनेक चांगले उपक्रम राबविले.

अधिक वाचा :

२० वर्षांच्या टवटवीत पोराला बाळासाहेब म्हणाले, ‘काय करतो ? विधानसभा लढतोस का ?’

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments