बारामतीत रेमडेसिवीरच्या नावाने विकत होते बनावट औषध. रुग्णांच्या जीवनाशी खेळणाऱ्यानां अटक

बारामती: राज्यात रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा सगळीकडे भासतो आहे. त्यासाठी कोरोना रुग्णांच्या नातेवाईकांची सगळीकडे धावपळ सुरु आहे. बऱ्याच मेडिकल दुकानांसमोर या इंजेक्शनसाठी मोठाल्या रांगा सुद्धा आहेत. मात्र एकीकडे अशी परिस्थिती असताना नातेवाईकांच्या हतबलतेचा गैरफायदा घेतल्या जात आहेत. चढ्या दराने रेमडेसिवीर इंजेक्शनची विक्री करणे, तसेच मुदत संपलेल्या औषधांना नव्या तारखेचे स्टीकर लावून ग्राहकांना विकणे असे प्रकार आतापर्यंत आपल्याला दिसून आलेले आहेत. आता मात्र रेमडेसिवीर इंजेक्शन मध्ये पॅरासिटीमाॅल गोळीचे पाणी टाकून इंजेक्शन विक्रीचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या घटने संदर्भात चौघांना बारामती तालुका पोलिसांनी काल रात्री ताब्यात घेतले आहे.
या घटनेसंदर्भात बारामती पोलिसांनी सापळा लावून शहरातील फलटण चौकात रेमडेसिवीर इंजेक्शन घेण्यासाठी सबंधित युवकाने बोलाविण्यात आले होते. तेव्हा त्याला अटक करण्यात यश आले. १३०० रुपयांचे रेमडेसिवीर इंजेक्शन ३५ हजाराला विक्री करणाऱ्या एका युवकाला जेरबंद केल्यानंतर ही माहिती उघडकीस आली. पोलिसांनी या संबंधित माहिती घेतल्या नंतर एका दवाखान्यातील कर्मचारी रिकाम्या झालेल्या रेमडेसिविरच्या मोकळ्या बाटल्या आणून त्यात सिरींजने पॅरासिटीमाॅल गोळीचे पाणी मिसळून पुन्हा फेव्हीक्विकच्या मदतीने या बाटल्या बंद करून पुन्हा त्या बाजारात नव्या म्हणून काळ्या बाजारात जास्ती दराने विक्री करण्याचा हा धंदा सुरु होता. या घटनेबाबत अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी पोलीस ठाण्यात दाखल झाले असून गुन्हेगारांवर कारवाई सुरु आहे.