मला लूज बॉल मिळत आहेत. त्यांना मला सीमारेषेबाहेर पाठवावेच लागते
मुंबई: मुंबईत एका क्रिकेट सामन्याच्या उद्घाटनाला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावली. भाजप आमदार कालिदास कोळंबकर यांच्या आमदार चषक क्रिकेट स्पर्धेला त्यांनी उपस्थिती लावली होती. या स्पर्धेचं उद्घाटन देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालं. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी फलंदाजीत हात आजमावला. एखादा बॉल हुकला, मात्र फडणवीसांनी बोलिंगवर जोरदार टोलेबाजी केली. या सामन्यानंतर, देवेंद्र फडणवीस यांना मीडियाने गाठलं. देवेंद्र फडणवीस यांना क्रिकेटमधील फटकेबाजीला जोडून सध्याच्या राजकीय फटकेबाजीबद्दल विचारलं.
सध्याच्या परिस्थितीत मला लूज बॉल मिळत आहेत. त्यांना मला सीमारेषेबाहेर पाठवावेच लागते, अशा शब्दात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी क्रिकेटच्या मैदानातून फटकेबाजी केली आहे. यावेळी पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, मला हल्ली सर्व लूज बॉल येत आहेत, बॅटिंग करायला मजा येतेय, मी बॉडिलाईन गोलंदाजी करत नाही, योग्य पद्धतीनं खेळतो.
आज क्रिकेटच्या भाषेत फडणवीसांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे. “क्रिकेटमध्ये बॅटिंग करायला मिळाली की मजा येते. मी लहानपणी क्रिकेट खेळायचो, तेव्हा बॅटिंगही करायचो आणि बॉलिंगही करायचो. फिल्डींग क्वचित करायचो. पण जेव्हा फिल्डींग करायचो, तेव्हा माझ्याकडून कॅच कधीच सुटायचा नाही. पण आता माझं ठरलंय, मी वेगवान बॉलिंगही करणार आहे, गुगलीही करणार आहे आणि बॅटिंगला येईन, तेव्हा शॉट्सदेखील खेळणार आहे”, असं ते म्हणालेत.
यूपीएचे कॅप्टन बदलण्याच्या विषयावर बोलताना ते म्हणाले की, कॅप्टन बदलावर १६ वा गडी बोलत आहे. त्याच्या म्हणण्याला अर्थ नसते, त्यासाठी टीममध्ये असावं लागतं.