मला बळीचा बकरा बनविण्यात येत आहे: सचिन वाझे
३ एप्रिल पर्यंत पोलीस कोठडीत वाढ
मुंबई: निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना गुरुवारी कोठडी संपत असल्याने त्यांना एनआयएच्या विशेष न्यायालयात आणण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्फोटके भरलेली वाहने ठेवल्या प्रकरणाशी संबंध नसल्याचे सांगत मला बळीचा बकरा बनविण्यात येत असल्याचे एनआयएच्या विशेष न्यायालयात सांगितले.
उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्फोटके भरलेली वाहने ठेवल्या प्रकरण आणि मनसुख हिरेन यांच्या हत्या प्रकरणात निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत आहे.
गुरुवारी सचिन वाझे यांची कोठडी संपत असल्याने त्यांना एनआयएच्या विशेष न्यायालयात आणण्यात आले होते. सचिन वाझे यांना पोलीस अधिकारी म्हणून सरकारी कोट्यातून ३० जिवंत काडतुसे देण्यात आली होती. ३० पैकी ५ काडतूस त्यांच्या कडे आहे तर २५ काडतूस गायब आहेत. ही २५ काडतुसे कुठ आहेत याची सुद्धा माहिती नसल्याचे वाझे यांनी सांगितल्याचे एनआयएने न्यायालयात सांगितले. ३ एप्रिल पर्यंत सचिन वाझे यांच्या कोठडीत वाढ करण्यात आली आहे.
सचिन वाझे यांच्यावर UAPA कायदा लावण्यात आला आहे. सचिन वाझे यांच्या वकिलांनी हा कायदा लागू पडत नसल्याचे न्यायालयात सांगितले. वाझे यांचे सहकारी रियाझ काझी हे सरकारी साक्षीदार बनणार आहेत. त्यामुळे वाझे यांच्या अडचणी वाढणार आहे.