‘या’ मनपाची शक्कल; विनाकारण बाहेर फिरल्यास अँटिजेन टेस्ट

औरंगाबाद: संचारबंदीच्या काळात विनाकारण कारणं सांगून बाहेर फिरणाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी औरंगाबाद मनपानं एक शक्कल काढलीय. त्यानुसार आता विनाकारण फिरताना आढळणाऱ्यांची अँटिजेन टेस्ट केली जाणार आहे. शहरातील विविध चौकात पोलिस आणि प्रशासनाकडून ही मोहीम राबवायला सुरुवातही करण्यात आली आहे.
कोरोना रुग्णांच्या संख्येचा विचार करता औरंगाबादचा क्रमांकही वरच आहे. शहरात रोज जवळपास दीड हजारांहून अधिक कोरोना रुग्ण आढळत आहे. कोरोनाची साखळी तोडून रुग्णसंख्येवर नियंत्रण मिळवण्याच्या हेतूनं राज्यात ब्रेक द चेन अंतर्गत कडक लॉकडाऊन आणि संचारबंदी लावण्यात आली आहे. काही सेवांना यातून सूट दिलेली असली तरी काही लोक विनाकारण रस्त्यांवर फिरत असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यावर आळा घालण्यासाठी विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांच्या अँटिजेन चाचणी केल्या जाणार आहेत. मनपा आयुक्त आस्तिक कुमार पांडे यांनी स्वतः ही माहिती दिली आहे.
विशेष म्हणजे शिफ्टनुसार दोन पथकं यासाठी तैनात करण्यात आल्याची माहिती पांडेय यांनी दिली आहे. सकाळी ९ते रात्री १ वाजेपर्यंत ही पथकं कारवाई करणार आहेत. अशा प्रकारची १२ मोबाईल पथकं यासाठी तैनात करण्यात आली आहेत. यासाठी महानगर पालिकेने एका व्हॅनमध्ये चाचणी करण्याचा निर्णय घेतला आहे. या व्हॅनसह हे पथक शहरात फिरेल. विनाकारण फिरताना दिसणाऱ्यांची हे पथक अँटिजेन चाचणी करणार आहे. शहरातल्या सर्वाधिक वर्दळ असणाऱ्या ठिकाणांवर पोलिस आणि प्रशासनाची सर्वाधिक नजर असणार आहे.