रेमडेसिवीर आहे असं कळलं असतं तर लोकांना सुजय विखेंचा नंबर दिला असता – जयंत पाटील

पुणे : १९ एप्रिल रोजी सुजय विखे पाटील यांनी दिल्लीवरुन रेमडेसिवीर आणून आपल्या मतदार संघात वाटले होते. यानंतर हा मुद्दा वादाचा बनला. कात्रजमध्ये कोव्हीड केअर सेंटरचे उदघाटन केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील पत्रकारांशी याविषयी संवाद साधताना म्हणाले, सुजय विखे यांच्याकडे रेमडेसिवीर आहे असं कळलं असतं तर लोकांना त्यांचा नंबर दिला असता. सुजय विखे यांचं प्रकरण गंभीर आहे. त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश मिळाले आहेत असंही जयंत पाटील यावेळी बोलताना म्हणाले.
राज्य सरकारने पहिल्या लाटेपेक्षा आता जास्त काम केलंय. रेमडेसिवीर किती लागणार हे अभिप्रेत नव्हतं. ऑक्सिजनची गरज आता जास्त भासायला लागली म्हणून बिकट परिस्थिती निर्माण झाल्याचं ते म्हणाले. महाराष्ट्रात १२ कोटी लोकसंख्या आहे. हळूहळू लसीकरण वाढवलं तर परिस्थिती आटोक्यात येईल .लसी उपलब्ध व्हायला पाहीजेत असे ते म्हणाले.
राज्याला जगात काहीही खरेदी करण्याचा अधिकार आहे. परकीय चलन उपलब्ध करता येतं. सिरमची लस राज्याला मिळणार आहे. मोफत लसीचा निर्णय मुख्यमंत्री घेतील. लसीकरणावर राज्यात गोंधळ नाही. नवाब मलिक यांनी भूमिका मांडली ती आमची भूमिका आहे. लस उपलब्ध होत नाही म्हणून यंत्रणेची नाकी नऊ होतायत, लस मिळाली की सगळं व्यवस्थित होईल असंही जयंत पाटील म्हणालेत.
प्रकरणाची चौकशी करून कारवाई करण्यात यावी
भाजप खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिल्लीहून रेमडेसिवीर औषध आणल्या प्रकरणाची चौकशी करून कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करणारी याचिका नगर जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल केली आहे. अनेक निर्बंध असतानाही सुजय विखे यांनी हे औषध कुठून आणलं, कुठे वितरित केलं याची चौकशी करून हे काम बेकायदेशीररित्या झाल्याचे आढळून आल्यास साठा जप्त करून कारवाई व्हावी, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे. या याचिकेवर २९ एप्रिल रोजी सुनावणी ठेवण्यात आली आहे. मात्र, तोपर्यंत संबंधित यंत्रणा आपल्या नेहमीच्या पद्धतीप्रमाणे यासंबंधी कारवाई करू शकतील, असे न्यायालयाने म्हटले आहे.