ह्रितिक @४९: वाढत्या वयाबरोबर अधिकचं तरुण होत चाललेला अभिनेता..!

एखादा चित्रपट पाहताना पाहणारे प्रेक्षक त्याच्या नायाकाकडून काय अपेक्षा करतात? तो देखणा असावा, पीळदार शरीरयष्टिचा, ज्याला नाचता येईल उत्तम अभिनय येईल, फाईट करता येईल. असा ‘हिरो’ सर्वांना अपेक्षित असतो. जे फक्त मनोरंजनासाठी पाहतात किंवा ज्यांना मसालेदार सिनेमे आवडतात किमान त्यांच्या साठी तरी.
असा प्रत्येक बाबतीत परिपूर्ण असलेला नट खूप कमी वेळा सापडतो.आणि जेव्हा अश्या परिपूर्णतेचा विचार येतो तेव्हा हमखास एक नाव समोर येत ते म्हणजे ह्रितिक रोशन. या गुणी अभिनेत्याचा आज वाढदिवस आहे.
प्रसिद्ध अभिनेते आणि दिग्दर्शक राकेश रोशन आणि पिंकी रोशन त्यांचा तो मुलगा. त्याचा जन्म १० जानेवारी १९७४ ला झाला.सध्याच्या आघाडीच्या अभिनेत्यांमध्ये त्याची गणना होते. ह्रितिक हा सुरुवातीच्या कालापासूनच आपल्याला विविध भूमिका साकारताना दिसला आहे.
त्याने २३ वर्षांच्या सिनेसृष्टीतील कार्यकाळात विविध प्रकारच्य सिनेमात त्याच्या अभिनयाचे कौशल्य दाखवले आहे. ह्रितिक हा अभिनयात जितका कसलेला आहे तितकाच तो नृत्यामध्ये देखील पारंगत आहे. याच बरोबर तो action दृश्ये करण्यात ही माहीर आहे.
ह्रितिकने सिनेक्षेत्रातील पदार्पण २००० मध्ये आलेल्या ‘कहो ना प्यार है ‘ या सिनेमा मधून केले असले तरी तो त्या पूर्वी पडद्यावर अनेक वेळा झळकला आहे. लहानपणी तो सिनेमातील गाण्यांमधून, व छोट्याश्या भूमिकांसाठी अभिनय करून लोकांसमोर आला आहे. १९८० मध्ये आलेल्या ‘भगवान दादा’ या चित्रपटात त्याने पहिल्यांदा अभिनय केला. त्यानंतर त्याने शिक्षण पूर्ण झाल्यावर १९९२ ते १९९७ मध्ये वडिलांच्या अनेक चित्रपटासाठी सहाय्यक म्हणून काम पाहिलं आहे.
‘कहो न प्यार है’ मधून त्याने मुख्य अभिनेता म्हणून काम केल. आत्तापर्यंत त्याने जवळपास २५ सिनेमात अभिनय केलाय आणि बऱ्याच सिनेमात त्याने अभिनयामध्ये बरेच प्रयोग केले. त्याच्या सुरुवातीच्या काळापासून त्याने वेगवेगळ्या भूमिका स्वीकारल्या आहेत. जसे फार पूर्वी त्याने ‘मिशीन काश्मीर’(२०००), ‘फिझा’(२०००) असे सिनेमे केले.
२००३ मध्ये आलेला ‘कोई मिल गया’ हा सिनेमा त्याच्या कारकिर्दीतील एक महत्वाचा टप्पा मनाला गेला. राकेश रोशन दिग्दर्शित या सिनेमात त्याने रोहित मेहरा ही भूमिका केली. त्यात त्याने एका मानसिक दृष्ट्या हळुवार वाढ होणाऱ्या मुलाची व एका सामान्य तरुणाची भूमिका केली होती. यात त्याच्या अभिनयाचे कसब दिसून आले. एकाच पडद्यावर या दोन भिन्न भूमिका दिसल्या मुळे त्याचे कौशल्य आधिकच अधोरेखित झाले.
ह्रितिक भूमिका निवडताना खूप विचार करून निवडत असावा असे त्याच्या भूमिकांची विविधता पाहून जाणवते. त्याच्या चित्रपटांमध्ये धूम, लक्ष्य, अग्निपथ, जोधा अकबर, या चित्रपटांचा विशेष उल्लेख होतो ज्यात त्याने विस्तीर्ण भूमिकांचे आव्हान उत्तमरीत्या पेलले आहे. त्याचा चित्रपट क्रिश लहान मुलांमध्ये विशेष गाजला. बऱ्याच वर्षांनी त्याचा दुसरा भाग देखील आला .
ह्रितिक जितका गुणी अभिनेता आहे तितकाच उत्तम नर्तक ही आहे. त्याची नाचण्याची एक वेगळीच शैली आहे. “ह्रितिक हा आमची उत्तम नाचण्यासाठी प्रेरणा आहे” असा बरेच अभिनेते म्हणले आहेत. ह्रितिक हा सिनेमा क्षेत्रातीलच काय पण जगातच सर्वात देखणा आहे असा म्हणल तरी अतिशयोक्ती ठरणार नाही कारण ह्रितिकने एकदा ‘ MOST HANDSOME MEN IN WORLD’ च्या यादीत अव्वल स्थान पटकविले होते.
ह्रितिक चा अभिनय हा कधीच साचेबद्ध असल्याचे जाणवत नाही. एकाच प्रकारच्या भूमिका करण्यात त्याला रस नसावा. उत्तम उदाहरण म्हणजे त्याचा ‘सुपर 30’ हा सिनेमा, यात त्याने गणितज्ञ आणि शिक्षक आनंद कुमार यांची भूमिका साकारली आहे.
पण, आज जसा ह्रितिक आपल्याला दिसतो गुणी, देखणा, आणि पिळदार शरीरयष्टीचा ह्रितिक आधी तसा नव्हता. चित्रपटात येण्यापूर्वी तो शरीरयष्टीने सामान्यच होता. डॉक्टरांनी त्याला त्याच्या पाठदुखीच्या त्रासामुळे अभिनेता न बनण्याचा सल्ला दिला होता. मात्र, यावर मात करत तो या टप्प्यावर आला आहे जिथे त्याने स्वतःला एक आघाडीचा अभिनेता म्हणून सिद्ध केल आहे. आणि सरत्या काळासह तो वाढत्या वयाला न जुमानता अखीनाच तरुण व तंदुरुस्त होत आहे.