कोरोनाचे नवीन रुग्ण अचानक कसे वाढले?
केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धनयांचे स्पष्टीकरण
नवी दिल्ली: देशात कोरोनाच्या नवीन रुग्णसंख्येत गेल्या एका महिन्यात मोठी वाढ झाली आहे. देशात कोरोनाचे नवीन रुग्ण अचानक कसे वाढले? याचं उत्तर केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी दिलं आहे. कोरोनावरील लस आली आहे. आता सर्व काही ठीक होईल, असं नागरिकांना वाटत आहे. नागरिकांना आता कोरोना संसर्गाचे गांभीर्य राहिलेले नाही. लोकांमधील कोरोनाबाबतचा निष्काळजीपणा वाढला आहे. यातूनच सुपर स्प्रेडरच्या घटना घडत आहे, असं हर्षवर्धन यांनी सांगितलं. दिल्लीत कोरोनावरील लसीचा दुसरा डोस घेतल्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते.
कोरोनावरील लस घेतल्यानंतर पुन्हा कोरोनाचा संसर्ग होणं ही दुर्मिळ घटना आहे. पण कोरोनावरील लसीचा डोस घेतल्यानंतरही कोरोनाचा प्रादुर्भाव होत असेल तर जीवाला असलेला धोका कमी असतो. सर्व पस्थितीत कोरोनाचा सामना करण्याची प्रक्रीया आता निश्चित झाली आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं. सरकारने मंजुरी दिलेल्या दोन्ही लसी( कोविशिल्ड, कोवॅक्सिन ) सुरक्षित आणि प्रभावी आहेत. या लसींचे डोस घेतल्यानंतर साइड इफेक्ट दिसून आलेले नाहीत. तरीही अनेकांना या लसींवर संशय आहे. व्हॉट्सॲपवरून फॉरवर्ड झालेल्या कुठल्याही मेसेजवर विश्वास ठेवू नका, लसीकरणासाठी पुढे या, असं आवाहन हर्षवर्धन यांनी नागरिकांना केलंय.
टेस्ट, ट्रॅक आणि ट्रीट हे अत्यंत गरजेचं आहे. ट्रॅकनंतर आयसोलेशन आणि ट्रीटमेंट गरजेची आहे. भारत सरकार कोरोनाची सर्व प्रकरणं गंभीरतेने घेत आहे. कोरोना लढाईविरोधात सरकारने २० लाख बेड बनवले आहेत. गेल्या आठवड्यात ४७ जिल्ह्यांसोबत बैठक झाली होती. आज सकाळी ४३० जिल्ह्यांत ७,१४,२१ किंवा २८ दिवसांत रुग्ण आढळून आलेले नाहीत, अशी माहिती त्यांनी दिली.
New Delhi: Union Health Minister Harsh Vardhan along with his wife Nutan Goel receives second dose of COVID-19 vaccine jab at Delhi Heart & Lung Institute. pic.twitter.com/ZKdT2QhPaY
— ANI (@ANI) March 30, 2021
लसीकरणासाठी थोडा वेळ द्या
आणखी जवळपास कोरोनावरील ७ लसींची क्लिनिकल ट्रायल सुरू आहे. तर दोन डझन लसी प्री क्लिनिकल ट्रायलमध्ये आहेत. सर्व राज्यांना १७ जानेवारी २०२० पासून मार्गदर्शक सूचना दिल्या जात आहेत. पंतप्रधान, कॅबिनेट सचिव हे राज्यांच्या मुख्य सचिव किंवा आरोग्यमंत्र्यांशी सतत संवाद साधत आहेत. लसीकरण मोहीम सुरू आहे. आता १ एप्रिलपासून ४५ वर्षांवरील सर्व नागरिकांना ५० हजार केंद्रांवर लसीकरण केले जाईल. आतापर्यंत यासाठी मोठ्या संख्येत नोंदणी झाली आहे. लसीकरणासाठी केंद्रावरही नोंदणी करता येऊ शकते. कोरोनासंबंधीची जागरूकता आणि लसीकरणासाठी थोडा वेळ दिल्यास आपल्याला कोरोनावर विजय मिळवता येईल, असं केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी स्पष्ट केलं.ss