अमरावतीचा भगवान दादा कसा बनला बॉलिवूडचा सुपरस्टार…

How Amravati's Bhagwan Dada became a Bollywood superstar ...
अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

ओ बेटा जी…

अरे ओ बाबू जी, किस्मत की हवा कभी नरम, कभी गरम

कभी नरम-नरम, कभी गरम-गरम,

कभी नरम-गरम नरम-गरम रे

ओ बेटा जी…

नेटफ्लिक्स वर अलीकडेच ‘लुडो’ नावाचा चित्रपट आला होता आणि सगळीकडे हेच लोकं गुणगुणत होते. बऱ्याच लोकांच्या कॉलरट्यून, रिंगटोन, स्टेट्सला आपण पाहिलं ही असेल. आपल्यातल्या ही लोकांनी हे गाणं सर्च केलं. आवडीने इतरांना ही रिकमेंड  केलं. किंबहुना लुडो चित्रपटापेक्षा जास्त या गाण्याचीच चर्चा मागच्या काही दिवसांमध्ये अधिक झाली. परंतु एका व्यक्तीची चर्चा मात्र जास्त झाली नाही, तो व्यक्ति म्हणजे भगवान दादा! भगवान दादा यांच्यामुळेच हे गाणं अजरामर झालं होतं. पूर्वी प्रसिद्ध असलेली अमिताभ बच्चन यांची ‘खायके पान बनारसवाला’ बघा किंवा आमिर खान यांचे ‘रंग दे बसंती’ मधील, ‘ना कोई पढणेवाला’ची स्टाईल बघा, ह्या वेगळ्या आणि मजेदार शैली आणि या सगळ्या स्टाईल भगवान दादांच्या आहेत. की ज्या प्रचंड लोकप्रिय झाल्या होत्या आणि आजही आहेत.

एकेकाळी प्रसिद्धीच्या व श्रीमंतीच्या शिखरावर असलेल्या दादांच्या बाबतीत नियतीची चक्रे अशी काही उलटी फिरली की अगदी होत्याचे नव्हते झाले. परिस्थिती व शरीर दोन्ही नीटपणे साथ देईनाशी झाली. अन्य अनेक कारणांमुळे दादा खचले. झमेला व अलबेला सारखे सिनेमे फ्लॉप झाल्यानंतर त्यांनी सगळे काही गमावले. एकेकाळी अलिशान गाड्यांमध्ये फिरणारे भगवान दादांचा शेवट दुर्दैवीच झाला होता.

भगवानदादा हे मूळचे महाराष्ट्रातील अमरावतीचे होते. त्यांचे पूर्ण नाव भगवान आबाजी पालव. वडील गिरणी कामगार असल्यामुळे भगवान दादा लहानपणीच मुंबईला यावं लागलं. भगवान दादांचे बालपण मुंबईला दादरच्या चाळीत गेले. दादांच्या घरची परिस्थिती बेताची असल्याकारणाने भगवान दादांना सुद्धा गिरणी कामगार म्हणून काम करावे लागले. कामगार म्हणून काम करत असताना त्यांच्या मनात चित्रपटसृष्टीची ओढ कायम होती. त्यांना त्यांचे आवडीचे क्षेत्र म्हणजे अभिनय आणि दिग्दर्शन खुणावत होते. त्यांनी काम करत अभिनयाच्या आलेल्या संधी सोडल्या नव्हत्या. अभिनय क्षेत्रात काम करत त्यांचे नावही मोठे होऊ लागले होते. परंतु भगवानदादा यावरही समाधान मानत नव्हते. त्यांनी खूप कमी काळात दिग्दर्शन आणि निर्मिती या गोष्टी शिकून घेतल्या. आणि त्या काळामध्ये अगदी कमी बजेटमध्ये ॲक्शन मुव्हीजची निर्मिती केली. विशेष म्हणजे हे सर्व ऍक्शन मूवी त्याकाळी सुपरहिट ठरले होते. त्यामुळे ते यशाच्या शिखरावर होते.

भगवानदादा चे एकावर-एक चित्रपट सुपरहिट होत होते. त्याच दरम्यान राज कपूर यांनी भगवान दादांना एखाद्या सामाजिक विषयावर चित्रपट बनवण्याची सुचवले. ही कल्पना भगवानदादांना देखील पटली आणि त्यांच्या कल्पनेतला ‘अलबेला’ नावाचा हा चित्रपट १९५१ साली प्रदर्शित झाला आणि बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट सुपरहिट ठरला. त्यांनी इतके यश आणि पैसे कमावले कधी काळी दादरचा चाळीत राहणारा भगवानदादा २५ खोल्यांच्या आलिशान बंगल्यात राहायला गेला होता. त्यांनी जुहू समुद्रकिनाऱ्यालगत अनेक बंगले विकत घेतले होते. त्यांच्या पार्किंगमध्ये अगदी महागड्या गाड्यांची रांग असायची. अशाप्रकारे ते वैभवाच्या आणि श्रीमंतीच्या शिखरावर जाऊन पोहोचले होते.

त्यांचे यश आणि श्रीमंती ज्या गतीने लोकांच्या समोर आली. त्याच गतीने भगवानदादांच्या या वैभवाला नजर लागली. १९५१ नंतर त्यांचे चित्रपट फारशे चालेना. भगवानदादा यांची मुख्य भूमिका असलेले चित्रपट फ्लॉप जाऊ लागले. त्यांची छोट्या-मोठ्या भूमिका असलेली चित्रपट देखील फारसे चालले नाहीत. त्यांचे उलटे चक्र सुरू झाले. त्यामुळे ते निराशेच्या गर्तेत सापडले. त्यांना अखेर नैराश्य आले. तरीसुद्धा एक शेवटचा प्रयत्न म्हणून त्यांनी किशोर कुमार सोबत एक बिग बजेट चित्रपट बनवायचं ठरवलं. या चित्रपटासाठी त्यांनी आपली सर्व संपत्ती व प्रॉपर्टी ती सर्व दाव्याला लावली. किशोर कुमार यांच्या सोबत या चित्रपटाचं चित्रीकरण चालू झालं. परंतु भगवान दादांचं दुर्दैव इथेही पाठ सोडत नाही. हा चित्रपट कधी रिलीज झाला नाही. भगवान दादा जो कधी काळी दादरच्या चाळीत राहत होता, त्याच घरात राहण्यासाठी भगवानदादांना पुन्हा जावं लागलं.

त्यात त्यांना आधीच दारूचे आणि जुगाराचे व्यसन होते पण या संकटामुळे ते या व्यसनाच्या जास्त आहारी गेले. त्यांचं उलटं चक्र हे इतक्या गतीने सुरू झालं की, भगवानदादाना त्या अपयशातून आणि त्या निराशेतून बाहेर पडणं अवघड झालं. त्यांचा शेवटचा काळ फार वाईट गेला. त्या काळच्या मोठ्या नट, नट्या, दिग्दर्शक आणि निर्माते यांनी भगवान दादांना भेटायचं देखील टाळलं. त्यामुळे ते एकाकी पडले. काही लोकं सोडली तर शेवटच्या काळात भगवानदादा यांच्यासोबत कुणीही नव्हतं. हा माणूस ज्याचा सुरुवातीचा काळ खूप हलाखीचा गेला परंतु तरीही या माणसाने चित्रपट सृष्टीला काय योगदान दिले हे तुम्ही-आम्ही कोणीही विसरू शकत नाही.


अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *