कोरोना रुग्णांसाठी सोनू सूदकडून १० ऑक्सिजन जनरेटरची मदत

मुंबई: संपूर्ण देशभरात कोरोनाची स्थिती फारच गंभीर झाली आहे. महाराष्ट्रात तर दिवसा ६० हजारांहून अधिक कोरोनाबाधित रुग्ण सापडत आहेत. वाढत्या रुग्णसंख्येला रुग्णालयात जागाच नसल्याचे अनेक ठिकाणी दिसत आहे. औषधे आणि रुग्णालयातील यंत्रणेवर मोठा ताण आहे. कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेच्या परिस्थितीत बॉलिवूड अभिनेता सोनू सूद रुग्णांच्या मदतीसाठी धावून आला आहे. मध्यप्रदेशमधील इंदौर येथे त्याने रुग्णालयांना मदत केली आहे.
देशात कोरोनाबाधित रुग्णसंख्या दररोज वाढत असून मृतांचा आकडाही वाढत असल्याने चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. रोज मोठ्या संख्येने कोरोना रुग्ण सापडत असल्याने त्यांच्यासाठी आवश्यक असणारा ऑक्सिजन साठा कमी पडत आहे. ऑक्सीजन सिलेंडर आणि खाटांची कमतरता रुग्णालयांमध्ये आहे. अशा बिकट परिस्थितीमध्ये अभिनेता सोनू सूदने मदतीचा हात पुढे केला आहे. त्याचा याबाबतचा एक व्हिडीओही ट्विटरवर आला आहे.
सर्व इंदौरवासियांनी कोरोनापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी योग्य ती काळजी घ्यावी. मला समजले की इंदौरमध्ये रुग्णांना ऑक्सिजन मिळत नाही. त्यासाठी माझ्याकडून दहा ऑक्सिजन जनरेटर इंदौरला पाठवत आहे. मी सर्व लोकांना विनंती करतो की, सर्वांनी एकमेकांना सहकार्य करावे ज्याद्वारे आपण या महामारीतून बाहेर पडू. मला पूर्ण विश्वास आहे की आपण एकमेकांना सहकार्य करत या मोठ्या समस्येतून बाहेर पडू, असे सोनूने या व्हिडीओमध्ये म्हटले आहे.
सोनूने आणखी एक ट्वीट करून म्हटले आहे की, ‘पँडेमिकमधील सर्वात मोठी शिकवण: देशाला वाचवायचे आहे तर रुग्णालय बनवायला हवी.’ यावरून काहींनी असा तर्क लावला की, भविष्यात सोनू सूद रूग्णालय देखील उभारणार आहे. मात्र सोनू सूदकडून याबाबत कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही. दबंगसारख्या चित्रपटांमध्ये खलनायकाची भूमिका करणारा सोनू खऱ्या आयुष्यात मात्र एखाद्या अभिनेत्यापेक्षा वरचढ आहे, असे म्हणावे लागेल. गेल्यावर्षी देखील लॉकडाऊनमध्ये त्याने अनेक गरजूंना मदत पोहोचवली होती. त्यामुळे सोनू अनेकांसाठी रिअल हिरो ठरला आहे.
महामारी की सबसे बड़ी सीख:
— sonu sood (@SonuSood) April 15, 2021
देश बचाना है
तो और अस्पताल बनाना है।