पोकळ बडबड करण्याऐवजी कोरोना रुग्णांना मदत कर, राखी सावंतचा कंगनाला सल्ला!

मुंबई : अभिनेत्री राखी सावंत आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळं नेहमीच चर्चेत असते. देशभरात घडणाऱ्या विविध घडामोडींवर ती रोखठोक प्रतिक्रिया देते. अनेकदा यामुळं तिला ट्रोल देखील केलं जातं. यावेळी राखीनं बॉलिवूडची क्वीन कंगना रणौतशी पंगा घेतला आहे. नुसती पोकळ बडबड करण्याऐवजी कोरोना रुग्णांना ऑस्कजनसाठी मदत कर असा सल्ला तिनं कंगनाला दिला आहे.
राखीनं नुकतीच वृत्त माध्यमांना मुलाखत दिली. या मुलाखतीत तिनं देशवासियांना डबल मास्क वापरण्याचा सल्ला दिला. शिवाय वेळोवेळी हात स्वच्छ करा. सॅनिटायझर वापरा, कारणाशिवाय घराबाहेर पडू नका. लॉकडाउनच्या नियमांचं काटेकोरपणे पालन करा असा सल्ला दिला. परंतु मुलाखतीच्या शेवटी नेहमीच्याच अंदाजात तिनं कंगनाशी पंगा घेतला. “नुसती पोकळ बडबड करणं थांबव. तुझ्याकडे कोट्यवधी रुपये आहेत. त्यापैकी थोडे पैसे दान कर कोरोना रुग्णांना ऑक्सिजन मिळवून देण्यासाठी मदत कर” असा उपरोधिक टोला तिनं कंगनाला लगावला.