Tuesday, October 4, 2022
Homeराजकीयसंसदेतील चर्चेचे रूपांतर गदारोळात झाले आहे का? 

संसदेतील चर्चेचे रूपांतर गदारोळात झाले आहे का? 

राजकारणात सध्याच्या घडीला अत्यंत खालच्या थरातील टीका करण्यात येत असून वेळप्रसंगी ती टीका, आरोप समोरच्याचे आयुष्यही उध्वस्त करू शकते. असाच काहीसा प्रकार काल देशाच्या सर्वोच्च सभागृहात पाहायला मिळाला. काल संसदेत काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याबद्दल केलेल्या “राष्ट्रपत्नी” टिप्पणीवरून गुरुवारी संसदेत सोनिया गांधी आणि स्मृती इराणी यांच्यात संतापजनक चर्चा झाल्यानंतर वाद उफाळून आला.

भाजप नेत्या, महिला आणि बाल विकास मंत्री स्मृती इराणी यांनी काँगेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी आणि काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी राष्ट्रपतींची तसेच समस्त महिलावर्गाची माफी मागावी अशी मागणी केली.

तसेच एका गरीब आदिवासी महिलेला नरेंद्र मोदींनी देशाच्या सर्वोच्च पदावर बसवले ही गोष्ट काँग्रेच्या पचनी पडत नाही असा आरोप केला. या नंतर त्यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या अनुमतीनेच अधीर रंजन चौधरी यांनी राष्ट्रपतींबाबत बेताल वक्तव्य केल्याचा आरोप केला. भाजप खासदारांकडून याला पाठिंबा देताना घोषणाबाजी करण्यात आली त्यामुळे सभागृहाचे कामकाज स्थगित करण्यात आले.

कामकाज स्थगित झाल्यांनंतरही भाजप खासदारांकडून घोषणा दिल्या जात होत्या. सोबतच सोनिया गांधींच्या राजीनाम्याची मागणी केली गेली. सभागृहाचे कामकाज पुन्हा सुरु झाल्यांनतर सोनिया गांधी यांनी भाजप खासदार रमा देवी यांना या वादात माझे नाव का घेतले जात आहे असा प्रश्न विचारला.

यावेळी तिथे उपस्थित असणाऱ्या स्मृती इराणींनी सोनिया गांधी यांना आपण तुमचे नाव घेतले असे सांगताच सोनिया यांनी स्मृती इराणींना तुम्ही माझ्याशी बोलू नका असे म्हणाल्याने हा वाद सुरु झाला.

यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे, तृणमूलच्या खासदार महुआ मोईत्रा, भाजपाचे प्रल्हाद जोशी आणि अर्जुन मेघवाल यांनी मध्यस्थी केली. काँग्रेसच्या खासदार गीता कोरा आणि ज्योत्स्ना महंत यांनी स्मृती इराणी तसंच भाजपाच्या काही पुरुष खासदारांना सोनिया गांधींशी गैरवर्तन केल्याचा आरोप केला आहे.

पण याआधी असे वाद लोकसभेत झाले होते का? तेव्हाचे नेते एकमेकांविरोधात या पातळीवर उतरून वाद करत असायचे का?

१९९९ साली भारतीय जनता पक्षाचे पहिले पंतप्रधान म्हणून अटलबिहारी वाजपेयी संसदेत भाषणाला उभे होते. आणि देशाचे पहिले पंडित जवाहरलाल नेहरुंबदल संसदेत बोलत होते. या वेळी बोलताना वाजपेयी असं म्हणाले कि असं नाही की नेहरुंशी आमचे मतभेद नव्हते. चर्चेत तर त्या मतभेदांना गंभीर रूप यायचं. ‘एकदा मी त्यांना लोकसभेत त्यांच्यावर टीका करतांना मी म्हणालो की तुमच्यामध्ये चर्चिल पण आहे आणि चेंबरलेन सुद्धा. पण माझ्या या वक्तव्याने नेहरु नाराज झाले नाहीत. संध्याकाळी एका कार्यक्रमात भेटले आणि म्हणाले, ‘आज जोरात भाषण केलंस तू’ आणि हसत निघून गेले’.

आजकाल तर अशी टीका करणं म्हणजे शत्रुत्व ओढवून घेणं आहे. लोक बोलायचे सोडून देतात. असे वाजपेयी म्हणाले. सोबतच त्यांनीं १९७७ सालची एक आठवण देखील सांगितली ज्यात ते म्हणले की, कॉंग्रेसच्या मित्रांना हे कदाचित अविश्वसनीय वाटेल. साऊथ ब्लॉकमध्ये नेहरूंचा एक फोटो लावलेला असायचा. मी येता जाता ते कायम पहायचो. आणि जेव्हा मी परराष्ट्रमंत्री झालो तेव्हा एक दिवस पाहिलं की तो भिंतीवरचा फोटो गायब झाला होता.

 मी विचारलं की तो फोटो कुठे गेला? काहीच उत्तर मिळालं नाही. पण ते चित्र तिथं परत लावलं गेलं. काय या देशात या भावनेची काही किंमत आहे?

यावेळी त्यांनी सदनात एक प्रश्न विचारला, एक राष्ट्र म्हणून आपण मिळून काम करू शकत नाही का? तसेच एक राष्ट्र म्हणून येणाऱ्या संकटांचा आपण एकत्रित सामना नाही का करू शकत ?

अडवाणींना द्यावी लागली होती स्पष्टोक्ती:

भाजपचे माजी अध्यक्ष लालकृष्ण अडवाणी आणि काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी ही दोन्ही भारतीय राजकारणातील मोठी नावे. हे संपूर्ण प्रकरण 2011 सालचे आहे. त्यानंतर फेब्रुवारी महिन्यात भाजपच्या वतीने लालकृष्ण अडवाणी यांनी सोनिया गांधी आणि माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचा स्विस बँकेत बराच पैसा असल्याचे म्हटले होते.

खरे तर, स्विस बँकांमध्ये दडलेल्या भारतीयांच्या काळ्या पैशाची माहिती गोळा करण्यासाठी आणि ते परत आणण्याचे मार्ग शोधण्यासाठी भाजपने ही विशेष टीम तयार केली होती. टीमने आपल्या अहवालात आरोप केला की, स्विस बँकेत खाती असलेल्यांमध्ये सोनिया गांधी आणि माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचाही समावेश आहे.

स्विस बँकेत खाते असल्याच्या या आरोपानंतर सोनिया गांधी यांनी लालकृष्ण अडवाणींना पत्र लिहून हे आरोप निराधार असल्याचे म्हटले होते. तसेच स्विस बँकेत आपले अथवा राजीवजींचे कोणतेही खाते नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

सोनिया गांधींच्या आक्षेपानंतर अडवाणींनी त्यांना पत्र लिहून दिलगिरी व्यक्त करत माफी मागितली होती. अडवाणींनी उत्तर पत्रात लिहिले – या प्रकरणात तुमच्या कुटुंबाचा उल्लेख केल्याचे मला वाईट वाटते. गांधी परिवाराने असे स्पष्टीकरण अगोदर दिले असते आणि त्यांचे नाव अहवालात आले नसते. 

पण काळ बदलला तसे नेते बदलले. सामंज्यस्याची भूमिका मागे पडून नेत्यांमध्ये कट्टर शत्रुत्व निर्माण झाल्याचे पाहायला मिळते. राजकीय विरोध टोकाचा असेल पण राजकारणातील एकमेकांप्रती असलेला सन्मान, संस्कृती, शालीनता टिकवली पाहीजे.

हे ही वाचा:

संधिसाधू, सत्तापिसासू किंवा म्हणा गद्दार, पण सोपे नाही होणे अब्दुल सत्तार…

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments