हरिद्वार कुंभमेळा : १०२ भाविकांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह

हरिद्वार: उत्तराखंडसह संपूर्ण देशभरात कोरोनाचा प्रसार झपाट्यानं वाढताना दिसत आहे. मात्र, हरिद्वार कुंभमेळ्यावर याचा काहीही परिणाम झाला नसल्याचं चित्र आहे. सोशल डिस्टन्सिंग, मास्क आणि कोरोनाचे नियम पायदळी तुडवत लाखोंच्या संख्येनं भाविक कुंभमेळ्यासाठी दाखल होत आहेत. इथे झालेल्या प्रचंड गर्दी दरम्यान थर्मल स्क्रीनिंग आणि इतर उपाययोजना करण्यात राज्य सरकारही अपयशी ठरलं आहे. मात्र, मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांचा असा दावा आहे, की शाही स्नानाच्या वेळी राज्य सरकारनं केंद्राकडून जारी करण्यात आलेल्या सर्व सूचनांचं पूर्णपणे पालन केलं आहे.
कुंभमेळा पोलीस नियंत्रण कक्षाच्या म्हणण्यानुसार, सोमवारी झालेल्या दुसऱ्या शाही स्नानामध्ये ३१ लाखाहून अधिक जणांनी सहभाग घेतला होता. आरोग्य विभागाच्या म्हणण्यानुसार, यादरम्यान रविवारी रात्री साडेअकरा वाजेपासून सोमवारी संध्याकाळी पाच वाजेपर्यंत १८ हजार १६९ भाविकांची कोरोना चाचणी केली गेली, यातील १०२ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
मेळा प्रशासनाकडून थर्मल स्क्रीनिंगची व्यवस्थाही केली गेलेली नाही. सीसीटीव्ही कॅमेरे असतानाही अनेक श्रद्धाळू विना मास्क फिरताना दिसत आहेत. उत्तराखंडचे डीजीपी अशोक कुमार महाकुंभच्या दुसऱ्या स्नानाबद्दल बोलताना म्हणाले, की आमचा पूर्ण प्रयत्न आहे, की जितकं शक्य होईल तितकं कोरोना नियमांचं पालन झालं पाहिजे. सुरक्षेच्या दृष्टीनं उत्तराखंड पोलिसांसाठी हे मोठं आव्हान आहे. मेळ्यासाठी जितक्या लोकांची येण्याची शक्यता होती, त्यातील कोरोनामुळे केवळ ५० टक्केच लोक आल्याची माहितीही त्यांनी दिली आहे.
कुंभमध्ये सोमवारी मोठ्या संख्येनं भाविकांनी गर्दी केली. या शाही स्नानासाठी झालेल्या गर्दीचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले. लोकांनी याचा तुलना २०२० मध्ये दिल्ली स्थित निजामुद्दीन दर्ग्यामध्ये झालेल्या मरकजच्या घटनेसोबत केली. मात्र, यावर उत्तर देत तीरथ सिंह म्हणाले, की याची तुलना मरकजसोबत करता येणार नाही. ते म्हणाले, की मरकज एका हॉलमध्ये होतं, याच हॉलमध्ये लोक झोपतदेखील होते.