happy birthday dhoni : पुन्हा असा कॅप्टन होणे नाही…

महेंद्रसिंह धोनी
अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

भारतात धोनी कोण आहे हे माहित नसणारा माणूस कितीही शोधला तरी सापडायचा नाही. तेव्हाच्या बिहारातील आणि आताच्या झारखंडमधल्या रांचीसारख्या छोटया शहरातून येणाऱ्या धोनीने करोडो भारतीयांच्या मनावर राज्य गाजवलं.

टीम इंडियाचा माजी कॅप्टन महेंद्र सिंह धोनीचा आज वाढदिवस . फक्त टीम इंडियाचाच नाही तर जगातील बेस्ट कॅप्टनमध्ये महेंद्रसिंह धोनीचा समावेश होतो.

७ जुलै १९८१ रोजी पानसिंग धोनी आणि देवकी धोनी यांच्या पोटी दुसरे पुत्ररत्न जन्मले. नाव ठेवलं महेंद्रसिंग . बहीण जयंती,भाऊ नरेंद्र आणि हे शेंडेफळ महेंद्र. शाळेत असताना अभ्यासात साधारण प्रगती असलेला महेंद्र खेळात जास्त रमायचा.

क्रिकेट खेळण्याआधी तो शाळेसाठी फुटबॉलचा गोलकीपर होता.
त्याला क्रिकेटमध्ये विकेटकिपिंग करणार का? असा प्रश्न विचारल्यावर काहीश्या अनिच्छेनेच तो म्हणाला मोठया बॉल बरोबर खेळायचं सोडून कोण लहान बॉल बरोबर खेळेल.

शेवटी प्रशिक्षकांनी त्याचे मन वळवून त्याला क्रिकेट खेळायला भाग पाडलेच. धोनीला विकेटकिपिंग शिकायला बराच संघर्ष करावा लागला.त्याकाळी १५ ओव्हरच्या मॅचेस खेळल्या जायच्या.

धोनीला विकेटकीपर असल्याने नेहमी फोर डाउनलाच खेळण्याची संधी मिळायची ज्यात बऱ्याचदा त्याचा वाट्याला काही यायचेच नाही. एकदा त्याने प्रशिक्षकांना विनंती करून आपल्या संघासाठी ओपनिंग केली. त्या मॅचमधली त्याची खेळी बघून हा पोरगा फक्त विकेटकिपिंगचं नाही तर ओपनिंग सुद्धा करू शकतो हे प्रशिक्षकांनी जाणले.

झालं, आतापर्यंत नुसती विकेटकिपिंग करून वैतागलेल्या धोनीला बॅटिंग मिळायला लागली आणि त्यानं नुसता हान कि बडीव कार्यक्रम सुरु केला. लांबच लांब सिक्स मारणारा बॅट्समन म्हणून त्याची ओळख होऊ लागली होती.धोनी हार्ड हिटर बॅट्समन च्या कॅटेगिरीत बसू लागला होता.

पण, त्याच्या घरची परिस्थिती आपल्यासारखी बेताचीच होती. आयुष्यभर काय क्रिकेट खेळणार का? घरच्यांकडन प्रश्न आला. आणि ह्याने रेल्वेची नोकरी धरली . रेल्वेत त्याला तिकिट चेकरची नोकरी मिळाली.

पण गड्याचा क्रिकेटचा नाद काय सुटेना. त्याने रेल्वेकडून क्रिकेट खेळायला सुरवात केली. बराच स्ट्रगल करून झाल्यावर त्याला रणजी खेळायचा चान्स भेटला.

रणजी खेळताना धोनी मुद्दाम शक्य तितक्या लांब सिक्स मारायचा. यातूनच तो सिलेक्टर लोकांच्या नजरेत आला. २००४ साली भारताकडून खेळाची संधी मिळाली. आणि बांगलादेश विरोधात पहिल्याच मॅचला झिरो वर रनआऊट. दुसऱ्या मॅचला तशीच सुमार कामगिरी.पण, कॅप्टन असलेल्या सौरव गांगुलीने धोनीला स्वतःला सिद्ध करण्याची संधी दिली.

२००५ साल उजाडलं. श्रीलंकन टीम भारताच्या दौऱ्यावर आली होती. या दौऱ्यात धोनीला ३ऱ्या नंबरवर खेळाची संधी मिळाली आणि त्याने या संधीचे सोनं केलं. श्रीलंकन फिरकीपटू मुथैया मुरलीधरन सहित सगळ्याच श्रीलंकन बॉलर्सना धोनीनं चांगलच धुतलं होतं.

धोनीने या मॅचमध्ये १८३ रन्स चोपल्या. विकेटकीपर बॅट्समन म्हणून सर्वाधिक रन्स करणारा खेळाडू हे रेकॉर्ड आजही त्याच्याच नावे अबाधित आहे.

बस, या नंतर धोनीने कधी मागे वळून बघितलेच नाही. कसोटी क्रिकेट अगदीच रटाळ झालं होत. एकदिवसीय सामन्यांमुळे नाही म्हणायला प्रेक्षकवर्ग टिकून होता. आणि याच काळात आयसीसी ने २०-२० क्रिकेटला मान्यता दिली. ३ तासांचे सामने तसेच वेगवान निकाल असे या २०-२० चे स्वरूप होते.

भारताकडून सचिन, गांगुली, द्रविड अशा दिग्गजांनी 20-20 वर्ल्डकप स्पर्धा खेळण्यास नकार दिला. आणि कर्णधारपदाची माळ धोनीच्या गळ्यात पडली. सोबतीला संघात नवीन आलेल्या पोरांची टीम होती.

नाही म्हणायला हरभजन, सेहवाग, गंभीर असले अनुभवी खेळाडू सोबत होतेच. कोणालाच अपेक्षा नसतानाही धोनीच्या नेतृत्वाखालील टीमने पाकिस्तानला धूळ चरत विश्वचषकावर भारताचे नाव कोरले.

एका नवख्या पोराच्या हाती संघाची कमान दिली आणि त्याने संघाला विश्वचषक जिंकून दिलाय अशी उदाहरण क्रिकेटच्या इतिहासात फार क्वचित सापडतील.

मात्र, भारतात महेंद्रसिंह धोनी नावाच्या अवलियाने हा करिष्मा करुन दाखवला. २००७ साली पाकिस्तानवर अंतिम सामन्यात मात करुन भारताला पहिला टी-२० विश्वचषक मिळवून दिल्यानंतर धोनी हे नाव कोट्यवधी भारतीयांच्या मनात आणि ओठावर यायला सुरुवात झाली.

या स्पर्धेनंतर धोनीने कधी मागे वळून पाहिलचं नाही, आणि हळूहळू धोनीचा माही आणि कॅप्टन कूल कधी झाला हे कदाचीत त्यालाही समजलं नसेल. एखाद्या संघाचा कर्णधार कसा असावा याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे महेंद्रसिंह धोनी उर्फ माही.

२०११ साली विश्वचषक जिंकत क्रिकेटच्या देवाला दिलेला सेंड ऑफ या जन्मात तरी विसरता येणं निव्वळ अश्यक्य आहे. श्रीलंकेच्या नाकावर टिच्चुन जिंकलेला वर्ल्डकप आणि धोनीने मारलेला शेवटचा सिक्स ही आठवण करोडो भारतीयांच्या मनावर कायमची कोरली गेली.

आज धोनीने ४०शी पार केलीय. पण , मैदानातला त्याचा उत्साह हा पंचवीशीतल्या खेळाडूला लाजवेल असाच आहे . विश्वचषक जिंकल्यानंतर तरुण खेळाडूंच्या हाती चषक सोपावून ग्रूप फोटोमध्ये एका कोपऱ्यात उभं राहणं असो किंवा चांगली खेळी करणाऱ्या खेळाडूला विनिंग शॉट खेळण्यासाठी दिलेली संधी असो…

प्रत्येक पातळीवर धोनीने स्वतःची वेगळी ओळख क्रिकेटच्या मैदानात प्रस्थापित केलीये.

धोनीने मिळालेल्या प्रत्येक संधीचा पुरेपूर फायदा उचलत संघातलं आपलं स्थान मजबूत केलं. क्रिकेटचे प्रत्येक नियम कोळून प्यायल्याप्रमाणे धोनी आपल्या संघाची रणनिती आखत गेला आणि दिवसागणिक भारतीय संघाची कामगिरी सुधारत राहिली.

आता उदाहरणासहितच सांगतो, तुम्हाला डीआरएस सिस्टिम माहितीच असलं ….. डीआरएसचं नाव डिसीजन रिव्ह्यू सिस्टिम बदलून धोनी रिव्ह्यू सिस्टिम असं करावं इतक्या पर्फेक्शनने धोनीने या सिस्टिमचा वापर केला.

कित्येकदा पंचांनी नाकारलेल्या अपीलाला धोनीने तितक्याच आत्मविश्वासाने आव्हान दिलं, आणि महत्वाची गोष्ट म्हणजे तिसऱ्या पंचांच्या पाहणीत धोनीचा निर्णय योग्य ठरायचा. विजेच्या चपळाईने केलेलं स्टम्पिंग असो किंवा त्याच चपळाईने केलेलं रनआऊट…प्रत्येक सामन्यात तुम्हाला धोनीचा विशेष टच हा दिसलाच पाहिजे.

बरं हे सगळं झालं कॅप्टन म्हणून, बॅट्समन म्हणूनही धोनीने मिडल ऑर्डर इतकी ताकदवर केली कि त्याच्या या निर्णयाने भारतीय संघाच्या बॅटिंगची दिशाच बदलून टाकल्या.

हेलिकॉप्टर शॉ़टने विरोधी टीमच्या बॉलरची धुलाई असो किंवा अशक्य वाटणारा विजय आपल्या फटकेबाजीने शक्य करुन दाखवणारी खेळी असो, धोनी भारतीय क्रिकेटचा आधारस्तंभ बनला होता इतकं मात्र नक्की…

आयसीसीच्या सर्व स्पर्धेचे विजेतेपद पटकावणारा धोनी हा एकमेव कॅप्टन आहे.ज्यात २००७ मधील T20 विश्वचषक, २०११चा विश्वचषक आणि २०१३ मधील चॅम्पियन्स ट्रॉफीचा समावेश आहे.

टीम इंडियाची तर एक संपूर्ण पिढी धोनीच्या मार्गदर्शनाखाली तयार झाली आहे. धोनी आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून रिटायर झाला असला तरी, त्याच्यासोबत चेन्नई सुपर किंग्सच्या टीमकडून खेळण्याचं जगभरातील क्रिकेटपटूंचं स्वप्न असते.


अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *