शेतकऱ्याने उभारली डाळिंबाच्या पानाफुलांनी सजवलेली गुढी

कोपरगाव: अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर, जामखेड, पारनेर, भागाला डाळिंबाने सुबत्ता, समृद्धी मिळवून दिली. मात्र, डाळींबावर पडलेले रोग, पावसाच्या पाण्यामुळे उत्पादनावर झालेला परिणाम यामुळे संगमनेर, जामखेड, पारनेर भागातील बागायतदार आता ऊस पिकाकडे वळू लागले आहे. याकडे लक्ष वेधून घेण्यासाठी कोपरगाव तालुक्यातील सुरेगाव येथील प्रगतीशील शेतकरी वनिता व सचिन कोळपे यांनी डाळींबाच्या पानाफुलांनी सजवलेली गुढी उभारली आहे.
मराठी वर्षाची सुरुवात चैत्र महिन्यात गुढीपाडव्याने होते. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सर्वजण घरोघरी गुढ्या उभारतात. एका उंच काठीला रेशमाच्या खणाची घडी बांधतात. त्यावर चांदीचा गडू उपडा घालतात. कडुनिंबाची दहाळी व आंब्याची पाने त्यावर बांधतात. साखरेची गाठी व फुलांचा हार गुढीला चढवतात. घरासमोर उंच ठिकाणी गुढी उभारतात.
मात्र, कोळपे कुटुंबीयांनी यंदा गुढीला कडुनिंबाची डहाळी व आंब्याची पाने न लावता डाळिंब फळबागांचे घटत्या प्रमाणावर लक्ष वेधून घेण्यासाठी डाळींबाच्या पानाफुलांनी सजवलेली गुढी उभारली आहे. सचिन कोळपे हे प्रगतीशील शेतकरी असून कोपरगाव तालुक्यातील सुरेगाव येथील माजी सरपंच आहेत.
यावेळी बोलतांना सचिन कोळपे म्हणाले, संगमनेर, जामखेड, पारनेर, राहता भागाला डाळींबाने आर्थिक सुबत्ता, समृद्धी मिळवून दिली आहे. मात्र, त्यावर पडणाऱ्या रोगामुळे अनेक शेतकरी ऊस पिकाकडे वळत आहेत. या सर्वांनी परत डाळिंब उत्पादनाकडे वळावे आणि नवीन शेतकऱ्यांना प्रेरणा मिळावी यासाठी डाळींबाच्या पानाफुलांची गुढी उभारली असल्याचे कोळपे यांनी सांगितले.
७० ते ८० टक्के डाळिंबाचा वापर औषध निर्मितीसाठी होतो. औषधांच्या किमती कमी ठेवण्यात डाळिंबाचा मोठा वाटा आहे. आताही चांगल्या डाळिंबाच्या कॅरेटला ३ हजारा पर्यंत दर मिळत आहे. उत्तरप्रदेश, पंजाब मधील अनेक शेतकरी डाळिंबाचे रोप घ्यायला महाराष्ट्रात येत आहे. भविष्यात डाळिंबाला चांगले दिवस येणार आहेत. त्यामुळे ऊस पिकाकडे गेलेले शेतकरी यांनी परत डाळींबाकडे यावे अशी इच्छा सुद्धा सचिन कोळपे यांनी व्यक्त केली.