राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अभिवादन

मुंबई : राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाराजांच्या कार्याचं, विचारांचं स्मरण केलं आहे. तुकडोजी महाराजांनी सांगितलेली ‘ग्रामगीता’ ही केवळ गावांच्याच नव्हे तर अखिल मानवजातीच्या, विश्वासाच्या कल्याणाचा मार्ग आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या कार्याचा गौरव करुन त्यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन केले आहे.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आधुनिक विचारांचे कृतीशील संत होते. देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशाच्या जडणघडणीत त्यांनी मोलाचं योगदान दिलं. भारत गावखेड्यांनी बनलेला देश असल्यानं गावांचा विकास झाला तरंच देशाचा विकास होईल, ही त्यांची श्रद्धा होती. त्यासाठी त्यांनी स्वत:ला ग्रामविकासाच्या कार्याला वाहून घेतलं. खेड्यांच्या स्वयंपूर्णतेवर भर दिला. ‘ग्रामगीते’च्या माध्यमातून ग्रामोन्नतीचा मार्ग सांगितला. अज्ञान, अंधश्रद्धा, अनिष्ठ रुढी, अस्पृश्यता, जातीभेदाच्या निर्मुलनासाठी लोकांचं प्रबोधन केलं. सर्वधर्मसमभावाचा संदेश दिला. विवेकवादी समाजनिर्मितीचं ध्येय ठेवून लोकजागृतीचं काम केलं. देशाच्या, मानवतेच्या कल्याणासाठी कार्य करणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन असे अजित पवार म्हणाले आहेत.