‘दया बेन’ चा जेठालाल ला कायमचा अलविदा!
मुंबई: सोनी सब टीव्हीचा प्रसिद्ध शो ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ने नेहमीच प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे पण तरीही जेठालालचे कुटूंबात दया बेन नसेल तर अपूर्ण दिसते. मालिकेतले प्रत्येक पात्र महत्त्वाचे आणि विशेष आहे असं तारक मेहताचे निर्माते असित मोदी आणि नीला टेलीफिल्म्स नेहमीच म्हणत आलेत. पण तरीही या मालिकेत असणाऱ्या दया बेनचा एक वेगळा असा फॅन बेस आहे. दया बेन म्हणजेच दिशा वकानी २०१७ मध्ये मॅटरनिटी लीव्हवर गेली होती. दिशा वाकानी गेली ३ वर्षे शोमध्ये दिसली नव्हती. यापूर्वीसुद्धा बर्याच सिरियल कलाकारांनी मॅटरनिटी लीव्ह घेतली होती. त्या कलाकारांना देण्यात आलेल्या सुविधांपेक्षा वेगळ्या आणि अधिक सुविधा देण्याच्या दिशाच्या मागण्या असल्याची चर्चा होती.
कोईमोईने दिलेल्या वृत्तानुसार, गेल्या काही दिवसांपासून दिशा मालिकेत पुन्हा दिसणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. ती योग्य वेळेची वाट पाहत असल्याचे म्हटले जात होते. मालिकेत एका भागामध्ये तिला गोकूळधाममधील लोकांशी बोलताना दाखविण्यात आले. जेथे ती लवकरच अहमदाबादवरून परत येईल, असे आश्वासन देताना दिसली. पण आजपर्यंत ती काही परत येऊ शकलेली नाही.
तारक मेहताचे चाहते गेल्या चार वर्षांपासून दया बेनची भूमिका साकारण्यासाठी अभिनेत्री दिशा वाकानीची आतुरतेने वाट पाहत होते. त्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आहे. तिने एका मुलाखतीत शोमध्ये परत न येण्याबद्दल वक्तव्य केलं आहे. आता दिशाने मालिकेला रामराम ठोकला आहे. दिशा आणि मालिकेचे निर्माते यांच्यात बरीच चर्चा झाल्यानंतर दिशा वकानीने हा निर्णय घेतला असल्याचं स्पष्ट झालंय.
काय होणार दयाबेनचं? जर दयाबेन खरोखरच या कार्यक्रमात परत आली नाही, तर दयाबेनच्या व्यक्तिरेखेचं काय होईल? हा एक मोठा प्रश्न आहे. कारण, निर्मात्यांना दयाबेनच्या भूमिकेत एक परिपूर्ण चेहरा शोधण्यासाठी कठोर परिश्रम घ्यावे लागतील. दिशा वाकाणीने ज्या प्रकारे हे पात्र साकारले आहे, ते खरोखर कौतुकास्पद आहे. त्या व्यक्तिरेखेला दुसऱ्या कुणीही न्याय देणं तितकं सोपं होणार नाही. शिवाय या सगळ्याचा परिणाम मालिकेच्या टीआरपी वर देखील होऊ शकतो असं बोललं जातंय.