खुशखबर! रेमडेसिवीरच्या उत्पादनात होणार मोठी वाढ

Good news! There will be a big increase in the production of Remdesivir
अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

नवी दिल्ली : भारतात कोरोना विषाणूची दुसरी लाट खूपच भयानक रूप घेऊन आली आहे. दररोज कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. वाढत्या रुग्ण संख्येसोबतच रुग्णांसाठी आवश्यक असलेल्या रेमडेसिवीर औषधाचीही मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. परिणामी देशभरातील विविध ठिकाणी रेमडेसिवीरचा तुटवडा जाणवण्यास सुरुवात झाली आहे. यामुळेच आता रेमडेसिवीर निर्माता कंपन्यांनी आपल्या उत्पादनात मोठी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि रेमडेसिवीरची अचानक वाढलेली मागणी लक्षात घेता भारतातील रेमडेसिवीर उत्पादक कंपन्यांनी आपली क्षमता वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार आता रेमडेसिवीर इंजेक्शनची निर्मिती दरमहा ३८ लाख वायल वरुन ७८ लाख वायलपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.
रेमडेसिवीर इंजेक्शन निर्मितीची क्षमता वाढवण्यासाठी केंद्र सरकार करत असलेल्या उपक्रमांची माहितीही अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी सांगितली आहे. यामध्ये निर्यात थांबवणे, नवीन क्षमतांसाठी वेगाने मंजुरी, औषधासाठी वापरण्यात येणाऱ्या फॉर्म्युलेशनची निर्यात थांबवणे अशा उपक्रमांचा समावेश असल्याचंही त्यांनी सांगितलं.
रेमडेसिवीर उत्पादक कंपन्यांकडून सांगण्यात आले की, दर महिन्याला ७८ लाख वायल्स निर्मितीचं उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. येत्या काळात ही संख्या १ कोटी वायल्सपर्यंत पोहोचवण्याचा आमचा मानस असल्याचंही त्यांनी सांगितले आहे.
औषध निर्माण विभागाच्या शिफारसीनुसार, तातडीची गरज लक्षात घेता महसूल विभागाने रेमडेसिवीर इंजेक्शन आणि त्याच्या एपीआय / केएसएमवरील सीमा शुल्क माफ केले आहे अशी माहिती केंद्रीय रसायने आणि खते मंत्री डी. व्ही. सदानंद गौडा यांनी दिली आहे.


अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *