खुशखबर! पुण्याला थेट केंद्र सरकारकडून मिळणार कोरोना लस

पुणे: राज्यात कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. तर, लसीकरणावरून राज्य-केंद्र सरकार मध्ये संघर्ष पाहायला मिळत आहे. कालच पुण्याचे खासदार गिरीश बापट यांनी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांची भेट घेऊन पुण्याला लसीचा पुरवठा कामी होत असून तो वाढविण्यात यावा अशी मागणी केली होती.
शुक्रवारी केंद्रसरकार कडून पुणे जिल्ह्याला थेट कोरोना लसीचा पुरवठा करण्यात येणार आहे. याबाबत पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी ट्वीट करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहे. तसेच आज जिल्ह्यासाठी २ लाख ४८ हजार लसीचे डोस मिळाल्याचे मोहोळ यांनी सांगितले.
काय म्हणाले महापौर मुरलीधर मोहोळ
“केंद्र सरकारकडून पुणे जिल्ह्याला कोरोना लसीचा थेट पुरवठा सुरू झाला असून आज जिल्ह्यासाठी २ लाख ४८ हजार लस प्राप्त झाल्या आहेत. तर रविवारी १ लाख २५ हजार लस मिळणार आहेत. यात शहराला ४०%, ग्रामीणला ४० % आणि पिंपरी-चिंचवडला २०% टक्के लस मिळणार आहेत” असे ट्वीट मुरलीधर मोहोळ यांनी केले आहे.
खासदार गिरीश बापट यांनी काय केली होती मागणी
पुण्याचे खासदार गिरीश बापट यांनी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी पुण्यात लसीचा पुरवठा कमी झाल्याने या लसीकरण मोहिमेवर परिणाम झाला आहे. यामुळे पुण्यात लसीकरण वाढविण्याची मागणी केली केली आहे. पुणे शहरातील लसीकरणाची मोहीम अधिक गतिमान करावी व किमान आठवडाभर पुरेल एवढा प्रतिबंधक लसीचा पुरवठा करावा. अशी मागणी केली. यावेळी महाराष्ट्राला कोविडचे सुमारे साडे एकोणीस लाख डोस दिले जातील. असे आश्वासन डॉ. हर्षवर्धन यांनी दिल्याचे बापट यांनी सांगितले होते. दुर्धर आजाराने ग्रस्त व अंथरुणाला खिळून असलेल्या वृद्ध नागरिकांसाठी मोबाईल लसीकरण व्हॅन सुरू करण्याची परवानगी पुणे महापालिकेला देण्यात यावी. कोविड लसीकरणाकरिता खाजगी रूग्णालयांना परवानगी मिळवणे ही प्रक्रिया अतिशय क्लिष्ट आहे. ती सुलभ करून लसीकरणाचे प्रमाण वाढवावे. तसेच वेंटीलेटरची संख्या वाढवावी यासाठी मी केन्द्राकडे आग्रह धरल्याचे बापट यांनी सांगितले.