Wednesday, September 28, 2022
HomeUncategorizedनाट्यरसिकांसाठी आनंदाची बातमी!

नाट्यरसिकांसाठी आनंदाची बातमी!

मुंबई: मराठी चित्रपटसृष्टीला सुगीचे दिवस आले असं म्हणताना मराठी नाटकांकडे मात्र दुर्लक्ष होतं. मराठी प्रेक्षक हा मराठी चित्रपट पाहण्यासाठी जितका उत्सुक असतो तितकाच तो मराठी नाटक पाहण्यासाठीही उत्सुक असतो. परंतु, नाटकांची न परवडणारी तिकिटं त्याला नाट्यगृहांमध्ये जाण्यापासून अडवतात. सहकुटुंब नाटकाला जाणं हे सर्वसामान्य प्रेक्षकांच्या खिशाला न परवडण्यासारखं आहे. ही गोष्ट लक्षात घेऊन मराठी चित्रपट आणि नाटकक्षेत्रातील दिग्गज अभिनेते प्रशांत दामले यांनी एक उपक्रम सुरू केला आहे.

प्रशांत दामले यांनी एक अभिनव उपक्रम सुरु केला असून त्यांनी प्रायोगिक तत्वावर आपल्या नाटकांचे तिकीट दर १०० रुपये ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भातील माहिती दामले यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून दिलीय.

“अनेक नाट्यरसिकांनी मला संपर्क करून सांगितले की आम्हाला सहकुटुंब नाटक बघण्याची इच्छा आहे परंतु तिकीट दर जरा जास्त असल्यामुळे आम्ही पाहू शकत नाही. म्हणूनच मी असा निर्णय घेतला आहे की बाल्कनीचा तिकीट दर जो आधी ३०० रुपये आणि आणि २०० रुपये होता, तो आता फक्त १०० रुपये ठेवण्यात येणार आहे,” अशी घोषणा प्रशांत दामलेंनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून केलीय.

पुढे बोलताना प्रशांत दामले यांनी, “हा प्रयोग जर यशस्वी झाला तर हळू हळू मुंबईतील सर्व नाट्यगृहांमध्ये याच पद्धतीने प्रयोग करीन,” असा शब्द नाट्यरसिकांना दिलाय. त्याचप्रमाणे त्यांनी आपल्या पोस्टच्या शेवटी, ‘एकमेका सहाय्य करू अवघे उचलून धरू नाटक’ असं आवाहन नाट्यरसिकांना केलं आहे.

सध्या प्रायोगिक तत्वावर केवळ गडकरी रंगायतनमध्ये दोन प्रयोगांसाठी हे दर ठेवण्यात येणार आहेत. यापैकी पहिला प्रयोग हा ‘तु म्हणशील तसं’ नाटकाचा असून तो २६ मार्च रोजी रात्री साडेआठ वाजता आहे. या नाटकाची तिकीट विक्री सुरु झाली आहे. तर दुसरा प्रयोग ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’चा असून तो २८ मार्च रोजी सायंकाळी साडेचार वाजता आहे. या नाटकाची तिकीट विक्री आजपासून सुरु होत आहे. विशेष म्हणजे ही सवलतीच्या दरातील तिकीटं बुकमायशो या वेबसाईटवर उपलब्ध होणार नसून थेट नाटगृहामधूनच ही सवलतीच्या दरातील तिकीटं विकत घेता येणार आहेत, असंही प्रशांत दामलेंनी स्पष्ट केलं आहे.

अनेक नाट्यरसिकांनी या पोस्टवर सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. त्यावरुनच प्रशांत दामले यांनी, “मलाही हुरूप आला तुमच्या प्रतिक्रिया वाचुन,” असं कमेंट करुन म्हटलं आहे. त्याचप्रमाणे त्यांनी, “ही पोस्ट जेवढी व्हायरल करता येईल तेवढी करावी. म्हणजे आपल्याला जास्तीस जास्त रसिकांपर्यंत वेळेत पोचता येईल,” असं आवाहनही चाहत्यांना केलं आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments