प्रयत्नांती परमेश्वर! सुएज कालव्यातली जलवाहतूक पूर्ववत
द्राक्ष निर्यातदारांना दिलासा
काहिरा: मंगळवारी सकाळी ७.४० च्या सुमारास, चीनमधून माल भरुन एक कार्गो शीप नेदरलॅन्डला रवाना होत असताना इजिप्तच्या सुएज कालव्यात फसलं. समुद्री वाऱ्याच्या जोराच्या झोक्याने या जहाजाला दुसऱ्या दिशेला फिरवलं त्यामुळे चालकाचं जहाजावरचं नियंत्रण सुटल्याने हे ४०० मीटर लांबीचं आणि ५९ मीटर रुंदीचं जहाज या कालव्यात फसलं. त्यामुळे हा समुद्री मार्ग ब्लॉक होऊन समुद्रात जहाजांचं ट्रॅफिक जाम झालं.
सुएज कालव्यात हे महाकाय जहाज अडकल्याने जगाचे तासाला सुमारे २ हजार ८०० कोटी रुपयांची अर्थव्यवस्था थांबली होती. इतकच नाही तर सुएझ कालवा कोंडीचा नाशिकच्या द्राक्ष निर्यातदारांनाही फटका बसला होता. नाशिकचे द्राक्ष निर्यातदार राजाराम सांगळे यांचे २५ कंटेनर सुएझ कालव्यात अडकले होते. इतकंच काय तर या चार दिवसात जवळपास ४०० जहाजांची वाहतूक बंद झाली होती. हा कालवा ब्लॉक झाल्याने रोज जवळपास सरासरी ९.७ बिलियन डॉलर्सच्या मालाची वाहतूक थांबली होती. या जहाजाचा मालक जपानी व्यक्ती आहे. मालकाला वाटत होतं शनिवार संपेपर्यंत हा समुद्री मार्ग मोकळा होईल. पण तज्ज्ञांच्या मते, हा मार्ग मोकळा व्हायला अजून काही आठवड्यांचा काळ जाण्याची शक्यता होती त्यामुळे जगभरातला व्यापारी वर्ग गेल्या आठवड्यापासून प्रचंड चिंतेत होता.
‘एव्हरगिव्हन’ या महाकाय मालवाहू जहाजाची सुटका करण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू होते. अखेर सहाव्या दिवशी जहाजाची सुटका करणाऱ्या पथकाला यश आले असल्याचे वृत्त आहे. या मार्गातून लवकरच जलवाहतूक सुरू होणार. मात्र, कधीपासून सुरू होईल, याबाबत काहीही माहिती समोर आली नाही. सध्या जवळपास ४५० जहाज अडकले असल्याची चर्चा आहे. इजिप्तमधील स्थानिक वेळ पहाटे ४.३० वाजण्याच्या सुमारास या एव्हरगिव्हनची सुटका झाली.
BREAKING : EVER GIVEN ship has been UNSTUCK & Moving into #Suez Canal after 6 Days!!
— Joyce Karam (@Joyce_Karam) March 29, 2021
Egyptian crew managed to float it moments ago. It’s 5:42 am there: pic.twitter.com/GoMlYjQerL
सुएज कालवा
इजिप्तचा सुएज कालवा म्हणजे समद्रातील १९३.३ किमीचा एक चिंचोळा मार्ग. या कालव्यावर सत्ता गाजवण्यासाठी अनेक युध्द झाली आहेत. सध्या सुएज कालवा इजिप्तच्या ताब्यात आहे. सुएज कालवा आशियाला युरोपशी जोडण्याचं काम करतो. सुएझ कालव्यातील जलवाहतूक ठप्प झाल्यामुळे मालवाहू जहाजांना तब्बल ६००० मैल अतिरिक्त अंतर कापावे लागत होते यासाठी जवळपास ३००००० डॉलर्सचा जादा खर्च इंधनासाठी करावा लागत होता. जागतिक व्यापारापैकी या कालव्यातून १२ टक्के व्यापार सुएझ कालव्यातून होतो. कालव्यातील जलवाहतूक ठप्प झाल्याने महागाई वाढण्याची भीती व्यक्त केली जात होती.