त्यांना यूपीएससीची एक संधी द्या
खासदार डॉ. अमोल कोल्हे यांची मागणी
पुणे: कोरोना काळात घेण्यात आलेल्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी ) पूर्व परीक्षेला तयारी करणाऱ्या अनेक परीक्षार्थींना मुकावे लागले. यामुळे वयोमर्यादा ओलांडलेल्या अनेकांचे स्वप्न अधुरे राहिले आहे. यामुळे परीक्षार्थींचे नुकसान होऊ नये म्हणून अशा उमेदवारांना एक संधी देण्यात यावी अशी मागणी शिरूर लोकसभेचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केंद्र सरकारच्या कर्मचारी व प्रशिक्षण विभागाचे राज्यमंत्री डॉ. जितेंद्रसिंग यांच्याकडे पत्राद्वारे केले आहे.
यूपीएससीच्या ऑक्टोबर २०२० मध्ये घेण्यात आलेल्या पूर्व परीक्षेला कोरोनाच्या महामारी, लॉकडाऊन, प्रवासबंदी आदी कारणामुळे अनेक उमेदवारांना परीक्षा देता आली नाही. वयोमर्यादेमुळे शेवटचा प्रयत्न करणाऱ्या अनेकांची स्वप्न वयाची मर्यादा ओलांडल्याने अधुरे राहिले आहे.
यात डॉक्टर, पोलीस आदी कोविड योध्यांचा समावेश आहे. कोरोना काळात या योद्ध्यांनी जनसेवेला प्राधान्य दिल्याने त्यांना एक संधी मिळायला हवी. याबरोबर या काळात अनेक उमेदवार खेड्यात अडकले होते. त्यांना पुरेसे वाचन साहित्य, इंटरनेटची कमतरता भासल्याने अभ्यास करता आला नाही. अशा इच्छुक उमेदवारांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांना एक संधी उपलब्ध करून द्यावी अशी मागणी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केली आहे.
मात्र यापूर्वीच सर्वोच न्यायालयाने कोरोनामुळे शेवटची संधी हुकलेल्या एकदा परीक्षेला बसविण्याची मागणी करणारी याचिका फेटाळली आहे.पूर्वपरीक्षासाठी ज्यांनी आपली वयोमर्यादा ओलांडली आहे असा १०० उमेदवारांनी सर्वोच्य न्यायालयात याचिका केली होती. ती फेटाळण्यात आली आहे.