पुण्याला लसीचे अधिक डोस द्या; खासदार बापट यांची आरोग्यमंत्र्याकडे मागणी

पुणे: राज्यात कोरोना बाधितांची संख्या वाढत असतांना लस पुरवठ्यावरून केंद्र-राज्य सरकार मध्ये जुंपली आहे. पुण्याचे खासदार गिरीश बापट यांनी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी पुण्यात लसीचा पुरवठा कमी झाल्याने या लसीकरण मोहिमेवर परिणाम झाला आहे. यामुळे पुण्यात लसीकरण वाढविण्याची मागणी केली आहे.
पुण्याचे खासदार गिरीश बापट यांनी गुरुवारी डॉ. हर्षवर्धन भेट घेतली. यावेळी त्यांनी पत्र देऊन पुण्यात कोरोनाचा उद्रेक वाढत असल्याचे सांगत शहरातील लसीकरणाची मोहीम अधिक गतिमान करावी व किमान आठवडाभर पुरेल एवढा प्रतिबंधक लसीचा पुरवठा करावा. अशी मागणी केली. यावेळी महाराष्ट्राला कोविडचे सुमारे साडे एकोणीस लाख डोस दिले जातील. असे आश्वासन डॉ. हर्षवर्धन यांनी दिल्याचे बापट यांनी सांगितले. पुणे जिल्ह्यात एका दिवसात सुमारे साडेदहा हजार कोविडचे रुग्ण सापडले. ही संख्या चिंताजनक असून महाराष्ट्रातील आजची सर्वाधिक रुग्ण संख्या आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने प्रतिबंधक लस देण्याची मोहीम अधिक गतिमान करावी तसेच रुग्णालयातील बेड्सची संख्या वाढवण्यासाठी मदत करावी. असे निवेदन केन्द्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांना दिल्याचे त्यांनी सांगितले. पुण्यात सरासरी दररोज पंचवीस हजार नागरिकांना लस देण्यात येते. यामुळे शहराला दर आठवड्याला सुमारे दोन लाख वायल्स इतकी लस गरजेची आहे. लसीचा पुरवठा कमी झाल्याने या मोहिमेवर परिणाम झाला आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील खाजगी रुग्णालयांना लस देण्याची परवानगी द्यावी.
शहरातील अशा २१५ खाजगी रुग्णालयात लसीकरण करता येईल. त्या रुग्णालयाची यादीही केंद्र सरकारकडे सादर केली आहे. तसेच दुर्धर आजाराने ग्रस्त व अंथरुणाला खिळून असलेल्या वृद्ध नागरिकांसाठी मोबाईल लसीकरण व्हॅन सुरू करण्याची परवानगी पुणे महापालिकेला देण्यात यावी. कोविड लसीकरणाकरिता खाजगी रूग्णालयांना परवानगी मिळवणे ही प्रक्रिया अतिशय क्लिष्ट आहे. ती सुलभ करून लसीकरणाचे प्रमाण वाढवावे. तसेच वेंटीलेटरची संख्या वाढवावी यासाठी मी केन्द्राकडे आग्रह धरल्याचे बापट यांनी सांगितले.