कष्टकऱ्यांच्या खात्यात पाच हजार रुपये द्या-प्रविण दरेकर

मुंबई: भाजपच्या नेत्यांनी आज राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली. भेटीनंतर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी माध्यमांशी संवाद साधला. लॉकडाऊनमुळे सामान्यांचे हाल झाले आहेत. सामान्य नागरिक आणि कष्टकरांच्या खात्यात पैसे जमा करा. तसंच कष्टकऱ्यांच्या खात्यात पाच हजार रुपये द्या, अशी मागणी आम्ही सरकारकडे केली आहे, अशी माहिती प्रविण दरेकर यांनी दिली. शिवाय, राज्यपालांकडे आम्ही लसीसंदर्भात देखील चर्चा केली, असंही ते यावेळी माध्यमांशी बोलताना म्हणाले.
कोरोनाला आळा घालण्यासाठी राज्यात कठोर निर्बंध आणि लॉकडाऊन लावण्याच्या हालचाली होत आहेत. पण आधीच संकटात सापडलेला व्यापारी, छोटे व्यवयासिक देशोधडीला लागतील. त्यांच्यासाठी राज्य सरकारने काही ठोस भूमिका घ्यावी. हातावर पोट असणाऱ्यांसाठी राज्य सरकारने पॅकेज जाहीर करावं. त्यांच्या खात्यावर प्रत्येकी ५ हजार रुपये टाकावे, अशी मागणी यावेळी प्रविण दरेकरांनी सरकारकडे केलीये.
राज्यात कोरोना लसीचा मोठ्या प्रमाणात तुटवडा भासत आहे. राज्यपाल हे राज्याचे घटनात्मक प्रमुख आहे. त्यांनी केंद्र सरकारकडे कोरोना लसीबाबत पाठपुरावा करावा. महाराष्ट्राला कोरोना लसीचा जास्तीचा साठा मिळवण्यासाठी त्यांनी प्रयत्न करावे, अशी विनंती आपण राज्यपालांकडे केल्याचं दरेकरांनी सांगितलं.
आज MPSC परीक्षेबाबत बैठक बोलावण्यात आली होती. पण या बैठकीत लॉकडाऊनबाबत चर्चा सुरु झाली. तेव्हा माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि अन्य पक्षाच्या नेत्यांसोबत चर्चा केल्याशिवाय हा निर्णय होऊ शकत नाही. तसंच राज्यातील हातावर पोट असलेली गोरगरीब जनता, व्यापारी, छोटे व्यवसायिक यांच्यासाठी सरकारने ठोस भूमिका घेतल्यास लॉकडाऊनच्या निर्णयाला भाजप सकारात्मक प्रतिसाद देईल, असं दरेकर यांनी यावेळी स्पष्ट केलं.