मुलगी द्यावी श्रीमंताघरी, सून करावी गरिबाघरची!

give-a-daughter-to-a-rich-man-marry-a-poor-man
अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

The great Indian kitchen हा मल्याळम सिनेमा सध्या सर्वच सोशल मीडियात चर्चेचा विषय ठरतो आहे. कारण काय? तर भाषा, राज्य, संस्कृती, पदार्थांची नावं, उपसाभर करायच्या पद्धती वेगवेगळ्या असल्या तरी जाचणारा काच सर्वत्र सारखा आहे. स्वयंपाकघर ही पुरुषप्रधान संस्कृतीत बायकांची रियासत असते; पण खरं तर हे ही अर्धसत्य. स्वयंपाक घरात त्यांना राबायची मुभा असते सरसकट मेन्यू ठरवायची नव्हे. आजच्या तारखेला यात डब्याच्या भाज्या ठरवण्याचं, किचन हवं तसं लावून घ्यायचं स्वातंत्र्य मिळालही बाईला. पण मुळात संघर्ष कशासाठीचा आहे, हा प्रश्नच या सर्व चर्चेने बाजूला राहतो. आणि त्या मुद्द्याकडे आपल्या सर्वांचं लक्ष जाणं गरजेचं आहे.
शिक्षक असणारा चित्रपटातला नायक, त्याचे वडील ही समाजातील तथाकथीत प्रतिष्ठित घराण्यातले लोक. समाजाच्या दृष्टीने भले सज्जन, धर्मसंस्कार जपणारे इत्यादी. मग नायक स्थळ बघायला गेल्यानंतरचे सार्वत्रिक सोपस्कार यथासांग पार पडतात. मांडव शोभा करून लग्न लागतं. आणि इथपासून नात्यांमधले, दोन विचारातले, दोन भिन्न सांस्कृतिक प्रतलातले अंतर वाढायला लागते. सासूबाईंनी सासरच्या घरातल्या आवडी-निवडी सुनेला सांगणं गैर नव्हे फक्त त्या तेवढ्याच निगुतीने, राबून पूर्ण केल्या पाहिजेत हा हट्ट अस्थायी नव्हे? नव्या घरात रुजण्यासाठी आवश्यक असलेला संयम, अगदी कितीही मुक्त वातावरणात वाढलो असलो तरी सासरी वागतानाची अदब शाबूत ठेवणारी नायिका. तिला तरी आदर्श म्हणावं का? प्रत्येकाचे उत्तर वेगवेगळे असेल. पण जेव्हा नोकरीची संधी घरातूनच नाकारली जाते आणि आपल्या अस्तित्वाचा परीघ’ रांधा आणि शेजारी निजा’ एवढाच राहील की काय या भीतीने आणि शेवटी अनावर संतापाने खरकटे पाणी नवरा-सासऱ्याच्या तोंडावर भिरकावून ‘ती’ बाहेर पडते. लग्नाआधीचे थिरकते पाय घेऊन नव्या पंखांसह स्वतःची दुनिया घडवण्यासाठी! आणि पुरुषाचा यावरचा उतारा काय तर – ‘सारखी कामं करणारी आणि तथाकथित बायकोच्या कोंदणात बसणारी नवी बायको आणणे. ‘थोडक्यात काय? काम करणाऱ्या मादीची जागा दुसरी आज्ञाधारी मादी!
वरवर पाहता नायिकेचे असे निघून जाणे ही मोठी साहसी कृती आहे असं वाटतं. हो ना? पण स्वतःच्या असण्याचा फक्त एक मादी पलीकडे विचार करणं, स्वतःचं शरीर त्याच्या गरजा, स्वतःचं मन त्याची निगा आणि आजवर कमावलेल्या गुणवत्तेला न्याय देण्याची इच्छा बाळगणं म्हणजे अगदी आजच्या तारखेला ही चक्क ‘विद्रोह’ करणं समजलं जातं. यावर लग्नसंस्थेचे फायदे सांगणार लोक बायकांना त्यांचा संसारधर्म आठवायला सांगतात. वर्गात समाजशास्त्र शिकवणारा नायक पत्नी जेव्हा तिच्या शारीरिक गरजांबाबत आपलं मत मांडते, बाहेरून येताना त्याला सॅनिटरी नॅपकिन आणायला लावते तेव्हाही तो काहीसा अडकतो, उलट डाफरून उडवून लावतो. तेंव्हा फक्तं एक पुरुष म्हणून त्याचा नव्हे तर एक शिक्षणव्यवस्था म्हणून, त्याला वाढवणारे पालक म्हणून आणि समाज म्हणून आपण दांभिक असल्याचं कबूल करावं लागतं. खूप वेळा चावून चावून चोथा झालेला विषय म्हणून याकडे कोडग्या नजरेने पाहतोय… हे तेंव्हाच जाणवतं जेंव्हा सिनेमातल्या प्रसंगात आणि आपल्या घरात साम्यस्थळे दिसायला लागतात.
किचन झटकणे हा मुद्दाच इथे गौण होतो. त्या निमित्ताने सिनेमा जे सांगू पाहतो की व्यक्ती म्हणून स्त्रीचा स्वतंत्र विचार आपण करणार आहोत का? उच्च पदवीधर असूनही घरात मोलकरणीसारखी राबणारी सासू मुलीच्या बाळंतपणाला निघताना ते ‘जू’ नव्या सुनेच्या खांद्यावर टाकते, मासिक पाळीत सुनेच्या बदल्यात नवी नातेवाईक बाई ती जागा स्वीकारते पण त्या ‘चौकटीत’ फरक पडत नाही. म्हणजे सासू, सून, बहीण, शेजारीण इत्यादी वावरताना वेगवेगळ्या व्यक्ती आहेत हे दिसायला वावच नाही. कारण ती काहीही शिकली असली, काहीही कला तिच्यात असली तरी ती कमी अधिक फरकाने गृहकर्तव्य दक्ष असायला हवंच हा हट्ट कुणी कितीही नाकारलं तरी बहुतांश भारतीय घरात आजही आहे.
किचनला ग्रेट म्हणणं उपहास आहे असं वाटण्या इतपत त्या कृतींची वारंवारिता दिग्दर्शक टिपत राहतो. खरं तर यापुढे पुष्कळ स्त्री पुरुष नात्यातल्या विनिमायची, लग्नसंस्थेतल्या काम विभागणीची, एकूणच समतेची चर्चा करावी लागणार आहे. आपले सगळे प्रयत्न अजून बहुसंख्य बायकांना ‘रांधा – वाढा – उष्टी काढा’ यातून थोडं बाहेर पडण्यासाठीच सुरू आहेत हे दुर्दैव. बाया बघून उमजून जातीलच; बाप्यांनी अधिक उमजायला हवं!

The great Indian kitchen
Written and directed by- Jeo Baby


अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *