‘एंटीलिया’ समोर स्फोटके असलेले वाहन लावणाऱ्याचा शोध घेण्यासाठी १० पथके
ग्रामदेवी पोलीस ठाण्यात अज्ञाता विरोधात गुन्हा दाखल
मुंबई: उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या ‘एंटीलिया’ घरासमोर स्फोटके भरलेले वाहन आढळून आले असून एफआयआर दाखल करण्यात आली आहे. गुरुवारी संध्याकाळी मुकेश अंबानी यांच्या घरासमोरील वाहनात स्फोटके आढळून आली होती. यानंतर प्रचंड खळबळ उडाली होती.
या प्रकरणात अज्ञाताविरोधात ग्रामदेवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मुंबई पोलिसांनी माहिती दिली आहे. अंबानी यांच्या ताफ्यातील वाहनाचा क्रमांक आणि स्फोटके भरलेले वाहनाचा क्रमांक सारखाच असल्याचे समोर आले आहे. त्या वाहनात १ पत्र सुद्धा सापडले आहे.
याबाबत राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्वीट केले आहे. “मुंबईत उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर वाहनात स्फोटके आढळले असून त्यात २० जिलेटीनच्या काड्या आहेत. याचा तपास मुंबई पोलिसांची क्राईम ब्रांच करत असून लवकरच सत्य समोर येईल.”
२४ फेब्रुवारीला हे वाहन अंबानी यांच्या घरामोर लावण्यात आले होते. स्फोटके भरलेले वाहन हे ८ दिवसापूर्वी मुंबईतील विक्रोळी येथून चोरण्यात आले आहे. वाहनात सापडलेल्या जिलेटीनच्या काड्यावर नागपूर येथील कंपनीचे नाव आहे. काही दिवसांपासून मुकेश अंबानी यांच्या घराची रेकी करण्यात येत होती. वाहनात सापडलेल्या बॅग वर मुंबई इंडियन्स असे नाव लिहिलेले आहे. मुंबई पोलिसांचे १० पथके शोध घेत आहेत.