गंगापूर सहकारी साखर कारखान्याची होणार विक्री

औरंगाबाद: महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेकडून १ मार्च रोजी थकित कर्ज असलेल्या ७ कारखान्यांची विक्री करण्याच्या संदर्भात निविदा प्रसिद्ध करण्यात आली. यामध्ये गंगापूर सहकारी साखर कारखान्याचे देखील नाव आहे.
गेले पाच महिने १५ कोटी ७५ लाख रुपयांच्या अपहार प्रकरणामुळे गंगापूर सहकारी साखर कारखाना चर्चेत आहे. गंगापूर कारखान्यातील निधीची अफरातफर करण्यावरून कारखान्याच्या संचालक मंडळावर औरंगाबादमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यात भाजपचे आमदार प्रशांत बंब यांचेदेखील नाव आहे.
२०१३ मध्ये कारखान्याची विक्री होऊ नये म्हणून सभासदांनी कोर्टाकडे पैसे जमा केले. पण विक्रीचा व्यवहाराच रद्द झाल्यामुळे कारखान्याच्या खात्यामध्ये १५ कोटी ७५ लाख रुपयांची रक्कम पुन्हा जमा झाल्याचे सांगण्यात आले. पण या रकमेचा कारखान्याशी काही कर्तव्य नाही असे कारखान्याचे अध्यक्ष प्रशांत बंब आणि त्यांच्या काही संचालकांनी सांगितले. यामुळे कारखान्याच्या पैशांचा अपहार केल्याचा आरोप त्यांच्यावर झाला. या कथिक घोटाळ्याप्रकरणी आमदार प्रशांत बंब यांच्यासह सोळा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
२७ फेब्रुवारी २०२१ रोजी प्रादेशिक साखर संचालकांकडून गंगापूर साखर कारखान्यातील या कथित घोटाळा प्रकरणाच्या चौकशीसाठी लेखापरीक्षकांची नियुक्ती केली आहे. लेखापरीक्षकांना तीन महिन्यांच्या कालावधीमध्ये अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
आमदारांमुळे बँकेने आता कारखाना विक्रीची निविदा काढल्याने कारखान्याचे १४ हजार सभासद, कामगार यांचे अस्तित्व धोक्यात आले असल्याचे कारखान्याचे माजी चेअरमन कृष्णा पाटील डोणगावकर म्हणाले.