Friday, October 7, 2022
Homeब-बातम्यांचा२२ पोलीसांसह पोलीस चौकी जाळली म्हणून गांधीजींनी असहकार आंदोलन ९९ वर्षांपूर्वी मागे...

२२ पोलीसांसह पोलीस चौकी जाळली म्हणून गांधीजींनी असहकार आंदोलन ९९ वर्षांपूर्वी मागे घेतले होते..

तत्वाशी तडजोड न करणारा महान योद्धा म्हणजे महात्मा गांधी. नेतेमंडळी आपल्या अनुयायीवर्गाच्या मागे फरफटत जातात मात्र गांधी त्यातले नव्हते. कशाही पेक्षा तत्व महत्वाचे आणि ते जपताना कोणतीही हानी झाली तरी घाबरायचे नाही ही त्यांची भूमिका होती.

१९२२ साली इंग्रजांविरूद्ध रान पेटवण्यात महात्मा गांधी यांना यश आले. असहकार चळवळ ऐन जोमात असताना असा एक प्रकार घडला कि गांधीजींनी तातडीने आंदोलन मागे घेतले. सोबतचे कार्यकर्ते गांधीजींच्या या निर्णयामुळे नाराज झाले मात्र गांधी बधले नाहीत. ही संपूर्ण घटना चौरीचौरा प्रकरण म्हणून इतिहासात प्रसिद्ध आहे. ही घटना थोडी किचकट वाटत असली तरी तिचा समारोप रोमांचकारी आणि गांधीजींच्या उदात्त व्यक्तिमत्वाचे दर्शन घडवणारा आहे त्यामुळे आपण ते नक्कीच समजून घेतलं पाहीजे.

तर चौरी चौरा हे गाव उत्तर प्रदेश मधील गोरखपुर शहराजवळचे गाव आहे. गोरखपुर म्हणजे योगी आदित्यनाथ यांचा सध्याचा मतदारसंघ. १९२० मध्ये सुरू झालेले असहकाराचे देशव्यापी आंदोलन अहिंसक मार्गाने चालेल असा विश्वास गांधीजींना होता. परंतु ४ फेब्रुवारी १९२२ रोजी या गावात घडलेल्या एका घटनेमुळे असहकार आंदोलन थांबवावे लागले. १९१४ ते १९१८ मध्ये घडलेल्या पहिल्या महायुद्धात भारतीय जवानांनी अभुतपूर्व यश मिळवले होते. यातील बहुतांश जवान हे भारतीय असल्यामुळे इंग्रज सरकार भारतीयांच्या स्वातंत्र्याचा विचार करेल अशा आशेचे वातावरण तयार झाले. परंतु झाले उलटेच, इंग्रज सरकारने १९१९ मध्ये अतिशय धोकादायक असलेला रौलट कायदा आणला. याच्या निषेधार्थ देशभर उग्र निदर्शने सुरू झाली. देश पेटून उठला होता.

भारतीय जनता मात्र या रौलट कायद्याच्या विरोध करत, मोर्चे, हरताळ करतच होती. १३ एप्रिल १९१९ रोजी पंजाबमधील जनतेने रौलेट कायद्याचा निषेध म्हणून व भारतीय नेत्यांना केलेल्या अटकेचा निषेध म्हणून जालियनवाला बाग येथे निषेध-सभा आयोजित केली. हजारो लोक या सभेला हजर होते. सभेच्या ठिकाणी जाणारा एकच अरुंद मार्ग होता. बाकी सर्व बाजूंनी पटांगण बंदिस्त होते. सभा सुरू असताना जनरल डायर या इंग्रज अधिकाऱ्याने अचानक निशस्त्र भारतीयांवर कोणतीही तमा न बाळगता बेछूट गोळीबार सुरु केला.जवळजवळ १६०० फैरी झाडल्या. दारूगोळा संपेपर्यंत शेकडो लोक मृत्यूुखी पडले होते. हजारो जखमी झाले. शासनाने मृतांचा आकडा ४०० सांगितला. पण तो १००० च्या वरती होता.

या घटनेच्या निषेधार्थ गांधीजींनी सप्टेंबर १९२० मध्ये असहकाराचे आंदोलन छेडले. गांधीजींनी त्यांच्या पद्धतीने मार्च १९२० मध्ये एक जाहीरनामा प्रसिद्ध केला होता. त्या जाहीरनाम्यामध्ये असहकार आंदोलनाचे स्वरुप स्पष्ट केले गेले होते. यात असे नमूद केले गेले की, स्वदेशी मालाचा वापर, सरकारी कामकाजावर बहिष्कार, सरकारी शाळा-कॉलेजात न शिकणं, सरकारने दिलेल्या पदव्या आणि मानसन्मान परत करणे इत्यादींसारख्या उपक्रमांद्वारे आंदोलन सुरू झाले होते. असहकार आंदोलनामुळे गांधीजींनी स्वातंत्र्यलढ्याचे स्वरूपच बदलून टाकले होते. सर्वसामान्य जनता या लढ्यात सहभागी झाली होती. सगळीकडे अभूतपूर्व उत्साहाचे वातावरण होते. गांधीजींनी या जाहीरनाम्यामध्ये एक कलम स्पष्ट रित्या समाविष्ट केले होते की, “मी अस्पृश्यता पाळणार नाही”.

१९२२ च्या फेब्रुवारीमध्ये चौरीचौरा येथे घडलेल्या घटनेच्या काही दिवसांपूर्वी गोरखपुर जिल्ह्यातील वातावरण तणावग्रस्त झाले होते. जानेवारी १९२२ च्या मध्यंतरात काँग्रेस आणि खिलापत समितीचे कार्यकर्ते लोकांना परदेशी मालावर बहिष्कार टाकण्याचे आवाहन करत होते. यामुळे तेथील चिडलेल्या स्थानिक पोलिसांनी आंदोलनकर्त्यांवर प्रसंगी अमानुष पद्धतीने लाठीमार केला. या घटनेचा निषेध म्हणून स्थानिक आंदोलकांनी ४ फेब्रुवारी १९२२ रोजी मोर्चा काढला. या मोर्चात सुमारे तीन हजारांच्यावर लोक सहभागी झाले होते. त्यांनी पोलिस स्टेशनच्या बाहेर पोलिसांच्या विरोधात घोषणा दिल्या. याचे उत्तर म्हणून आणि तेथील लोकांना पांगवण्यासाठी म्हणून पोलिसांनी हवेत गोळीबार करायला सुरवात केली. चिडलेल्या आंदोलकांनी दगडफेक करुन प्रत्युत्तर दिलं. या दगडफेकीत तीन लोक मारले गेले. पोलिसांनी घाबरून पोलीस स्टेशन आतमधून बंद करून घेतले. परंतु राग अनावर झालेल्या आंदोलकांनी कसलाही विचार न करता संपूर्ण पोलिस स्टेशनला आग लावली. त्यात २२ पोलीस जळुन खाक झाले.

या आगीच्या घटनेनंतर इंग्रज सरकारने वेगाने आंदोलकांची धरपकड सुरू केली. मोठ्या प्रमाणात दडपशाही सुरू केली, इंग्रज सैनिकांनी अनेकांना अटक केली, खटले उभे केले. गोरखपुर सेक्शन कोर्टाने सुमारे १७२ लोकांना फाशीची शिक्षा सुनावली. याविरुद्ध अलाहाबाद उच्च न्यायालयात अपिल केल्या गेल्या नंतर शेवटी १९ लोकांना फाशी देण्यात आली होती. गांधीजींनी असहकार आंदोलन मागे घेण्याच्या निर्णयावरती त्या काळात बरीच चर्चा झाली होती. मात्र सर्व भारतीयांचा हा समज आणखीनच दृढ झाला होता कि, गांधीजींचा अहिंसेच्या मार्गावर दृढ विश्वास आहे. गांधीजी म्हणायचे कि, आंदोलनात हिंसा शिरली की तुमच्या मागाण्यांमधील नैतिक शक्ती लयाला जाते.

चौरी चौरा गावात आजही घडलेल्या घटनेच्या ठिकाणी दोन स्मारके उभी आहेत. एक स्मारक आहे ते कर्तव्य पार पाडताना जीव गेलेल्या पोलिसांचे तर दुसरं स्मारक आहे ते स्वातंत्र्य चळवळीतील आंदोलनकर्त्यांच्या स्मरणार्थ. या उदाहरणावरून लक्षात येतं की भारतीय स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास किती गुंतागुंतीचा आहे. गांधीजींचे हे असहकार आंदोलन लौकिक दृष्टिकोनातून अयशस्वी जरी ठरले तरी यातून त्यांनी इंग्रज सरकारला एक प्रकारचा इशाराच दिला होता की, तुमचे साम्राज्यशाहीचे दिवस आता संपले आहेत. या घटनेमुळे तसेच असहकार आंदोलनामुळे भारतीयांच्या मनात असलेली इंग्रज सरकार बद्दलची भिती मात्र कायमची मारली गेली होती. लोकांना चळवळीचे महत्त्व कळले होते. तसेच आंदोलनात अहिंसा हा मार्ग कितीतरी लाख मोलाचा आहे याची प्रचिती देखील त्यांना आली. त्यानंतरच्या प्रत्येक लढ्यात भारतीय आंदोलक आनंदाने तुरुंगात जायला लागली.

असहकार आंदोलनाचा दुसरा एक फायदा म्हणजे परदेशी मालावरच्या बहिष्कारामुळे स्वदेशी मालाला चांगला भाव मिळाला. तसेच स्वदेशी कंपन्या आणि भारतीय भांडवलदारांच्या मालाचा खप वाढला. परिणामी या असहकाराच्या लढ्याने इंग्रज सरकारसमोर मोठे आव्हानच उभे राहिले. आणि या देशव्यापी लढ्यामुळे लोकांमध्ये स्वातंत्र्याची ओढ निर्माण झाली आणि राजकीय जागृतीमुळे हा लढा आणखीनच व्यापक झाला आणि त्याचे यश म्हणजे १५ ऑगस्ट १९४७ ला भारताला स्वातंत्र्य मिळाले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments