…तेव्हापासून माधवरावांनी कुंचला टाकला आणि लेखणी हातात घेतली

From then on, Madhavrao brushed his teeth and took the pen in his hand
अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

कोल्हापूर जिल्हा पुरोगामी विचारांचा व अचारांचा म्हणून समजला जातो.  राजश्री शाहू महाराजांच्या क्रांतिकारक विचारांचा आणि कर्तृत्वाचा वारसा बरोबर घेऊन तत्कालीन समाजामध्ये सामाजिक जागृती करणारे अनेक समाजसुधारक या कोल्हापुरात निर्माण झाले. कोणत्याही देशाचा इतिहास हा मोठ्या लोकांच्या चरित्रांनी घडलेलं असतं. तसेच कोणत्याही समाजाची संपन्नता ही त्या समाजातील व्यक्तींच्या विचारसंपन्नतेवर अवलंबून असते. गेल्या शंभर वर्षात कोल्हापुरातील अनेक व्यक्ती आपल्या कार्यकर्तृत्वाने समाजाला दिशा देत आल्या आहेत. अशा व्यक्ती, त्यांच्या जीवनातील प्रेरणादायी घटना प्रसंग, त्यांची कार्यपद्धती, त्यांचे सामाजिक – राजकीय वैचारिकता या सर्व बाबी महाराष्ट्राच्या जनतेसमोर विशेषतः आजच्या तरुण पिढीसमोर नव्याने मांडण्याची गरज आहे.

त्यातले एक महत्वाचे नाव म्हणजे, भाई माधवराव बागल! ते महाराष्ट्राचे एक थोर क्रांतिकारक समाजसुधारक होते. कोल्हापुरात राजर्षी शाहू महाराजांनंतर नाव घ्यावं असं एकमेव व्यक्तिमत्व म्हणजे भाई माधवरावजी बागल असं आजही म्हटले जाते. त्यांनी कोल्हापुरात बिंदू चौक येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा देशातला पहिला पुतळा उभारण्यासाठी पुढाकार घेतला. भाई माधवराव बागल यांचा जन्म २८ मे १८९५ ला कोल्हापूरला झाला. माधवराव यांचे वडील खंडेराव बागल हे, कोल्हापूर संस्थानातील पहिले बी.ए एलएलबी वकील होते. त्यावेळी राजर्षी शाहू महाराज हे कोल्हापूर राज्याचे छत्रपती होते. छत्रपतींनी उच्चशिक्षित खंडेरावांना आपल्या दरबारात अंमलदार म्हणून नेमणूक दिली होती.

त्यामुळे माधवरावांचे बालपण एका अंमलदाराचा मुलगा म्हणून श्रीमंतीत आणि ऐषाआरामात जाऊ लागले. माधवरावांच्या घरी अनेक सेवक नोकर चाकर होते. माधवरावांचे लाड करण्यासाठी किमान सात-आठ पट्टेवाले त्यांच्या सेवेला हजर राहत. ते आपल्या आत्मचरित्रात असे लिहितात, “मी शाळेला निघालो तरी दप्तर घेत नसे, सरकारी पट्टेवाला दप्तर घेऊन माझं पुढे चालत असे. नोकर मला साहेब म्हणत. अभ्यासात पहिला नंबर नसला तरी वर्गात माझी जागा पहिली असे मला बसण्यासाठी मऊ बसकर असे.  मास्तर मला अहो म्हणत असत. मास्तर मला शिकवायला घरी येत असत.  त्यांना आमचीच मर्जी सांभाळावी लागत असे. माझ्या आठवणीत पाढे रहावेत म्हणून त्यांना घोकत बसावे लागे. अशा एकूण वातावरणामुळे माझ्या अंगी नकळत एक प्रकारचा मोठेपणाचा ताठा व हुकूमशाही वृत्ती आली “

वडिलांच्या सहवासात त्यांना त्या वेळच्या समाजातील विषमता ब्राह्मण उच्चनीचता प्रकर्षाने जाणवली. माधवरावांनी शाळेत पंगती भेद पहिला होता. अस्पृश्यांच्या मुलांना शाळेत अगदी दूर बसवले जात होते. त्यामुळे त्यांचा स्वाभिमान दुखावला गेला. समाजातील विषमता ब्राह्मण याबद्दल त्यांच्या मनात चीड निर्माण झाली. मंदिरातही असाच शिवाशिवीचा प्रकार चालू होता. नृसिंहवाडी दत्त मंदिर, कोल्हापूरचे महालक्ष्मी मंदिर अशा अनेक ठिकाणी हे गैरप्रकार चालत होते. नरसिंहवाडीला सरकारी खर्चाने गुरुद्वादशीला जेवण दिले जाई. तेथे फक्त ब्राह्मण लोकांच्या पंगती बसत. ते यथेच्छ भोजन करीत आणि मग उरलेले अन्न ब्राह्मणेतरांना प्रसाद म्हणून थोडे-थोडे वाढले जाई. खंडेरावांनी आपल्या सरकारी अधिकाराचा वापर करीत हा पंक्तीभेद बंद केला आणि ब्राह्मण बरोबरच इतर लोक एकाच पंक्तीला बसतील अशी व्यवस्था केली.  अर्थात त्यामुळे ते ब्राह्मण वर्गात अप्रिय झाले या प्रसंगाचा माधवरावांवर परिणाम झाला. तसेच स्वदेशी गोष्टी वापरणे, खादीचे कपडे वापरणे, साखरेचे लाडू खायचे नाहीत इत्यादी अशा गोष्टी व त्यांचे महत्त्व त्यांना पटू लागले.

बालपणापासून निसर्गसौंदर्यात रमणाऱ्या माधवरावांचा लँडस्केप खास आवडीचा विषय होता. पुढे ते मुंबईला जेजे स्कूल ऑफ आर्टमध्ये दाखल झाले आणि त्यांची राहण्याची सोय शाहूमहाराजांच्या बंगल्यात झाली. शाहू महाराजांनी आज्ञा केल्याप्रमाणे माधवरावांनी मॉडेलिंगचा चार वर्षाचा कोर्स दोन वर्षातच यशस्वीपणे पूर्ण केला. शाहू महाराजांनी हा कोर्स करण्याचे सुचवले कारण संस्थानाचे लाखो रुपये पुतळे करण्यासाठी बाहेर जातात तेव्हा ते पैसे बाहेर न जाता आपल्याच कलाकाराला मिळावेत संस्थानाचा पैसा बाहेर जाऊ नये ही त्यांची इच्छा होती.

माधरावांचा प्रत्यक्ष शाहू महाराजांशी संबंध हा त्यांच्या जडणघडणीतला महत्त्वाचा टप्पा ठरला. मुंबईतील हिंदू खानावळीत ते जेवण  घेऊ लागले. जातिभेद, धर्मभेद, मानल्या न जाणाऱ्या मुंबईतील त्या समाजजीवनातील अनुभवातून, निरीक्षणातून आणि ज्ञानातून माधवरावांचे व्यक्तिमत्त्व आकार घेऊ लागले. त्या दरम्यान महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली देशात स्वातंत्र्य चळवळीने जोर धरला होता. या चळवळीशी माधवरावांचा संबंध आला आणि त्यांच्या आचार – विचारांवर परिणाम झाला. उंची रेशमी कपडे वापरणारे माधवराव, देशी खादीचे कपडे वापरण्यास सुरूवात केली.

मुंबईतील शिक्षण पूर्ण करून माधवराव कोल्हापूरला परतले. दरम्यान शाहू महाराजांचे १९२२ साली निधन झाल्याने त्यांचा मुलगा अर्थात राजाराम महाराज सत्तेवर आले होते. तेव्हा सरकारी सेवेतून निवृत्त झाल्यानंतर त्यांच्या वडिलांनी कोल्हापुरात हंटर पत्र सुरू केले. खंडेराव सामान्य लोकांच्या विकासासाठी त्यांच्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी जनजागृतीसाठी हंटर मधून लिहीत असत. ते सत्यशोधक समाजाचे समर्थक होते तसेच जातीव्यवस्थेचे विरोधक होते. ते कोल्हापुर सरकारच्या चुकीच्या अन्यायकारक धोरणावर देखील  टीका करत असत. वडिलांचा या समाज कार्यात आपणही मदत करावी असे माधवरावांना वाटू लागले. कुंचला टाकून लेखणी हातात घ्यायला कारणीभूत व्हायला लावणारी आणखी एक घटना घडली. सत्यशोधक समाजाच्या वतीने महात्मा गांधी यांची कोल्हापूरला १९२७ मध्ये भेट आयोजित केली गेली होती. त्यामध्ये खंडेराव यांची भूमिका महत्त्वाची होती. गांधीजींना दिलेले मानपत्र त्यांनी तयार केले होते. गांधीजींनी भेट दिली तेव्हा मोटारीत त्यांच्यासमवेत बसण्याची माधवरावांना संधी मिळाली. चित्रकार म्हणून माधवरावाने स्वतःची ओळख सांगितली. तेव्हा गांधीजी त्यांना म्हणाले, “जनसेवा घडेल अशी चित्रे काढा.” या उपदेशाचा माधवरावांवर ती परिणाम झाला. त्यांना प्रश्न पडला की, ‘मी चित्रे काढणार, त्यातून श्रीमंताचे मनोरंजन होईल, पण उपाशी अर्धपोटी जगणाऱ्या गरीब लोकांना त्याचा काय उपयोग?’ त्यानंतर त्यांनी कुंचला टाकून दिला आणि सामान्य लोकांसाठी त्यांनी लेखणी हातात घेतली.

हंटर मध्ये खादी विषयी लिहू लागले. हंटर चे धोरण काँग्रेसला अनुकूल होते. त्या काळात काँग्रेसच्या धोरणाचा पुरस्कार करणे म्हणजे राज्याचा आणि संस्थांनी अधिकाऱ्यांचा रोष ओढवून घेण्यासारखे होते. पण बागल पितापुत्रांनी मोठ्या धाडसाने आपले धोरण राबविले. माधवरावांचे लक्ष कोल्हापुरातील शाहू मिलकडे गेले. तेथील कामगारांची अवस्था वाईट होती. कामाचे तास जास्त, तर वेतन अल्प होते. तसेच इतर सुविधांचा अभाव होता. मिलच्या मालकाला सुधारणा करण्यास सुचवले पण त्यांनी ऐकले नाही. मग माधवरावांनी हंटर मधून गिरणी कामगारांच्या हिताचे लिखाण केले. त्यांच्या वाणी आणि लेखणीलां आणखी धार आली. त्यानंतर जाहीर सभेत ते भाषणेही करू लागले. खादी, स्वदेशी, ग्रामपंचायत, अस्पृश्यता-निवारण, जातीभेद अशा विषयांवर बोलू व लिहू लागले. गांधीजींच्या धोरणानुसार कोल्हापुरात ते मिरवणुका आणि प्रभातफेऱ्या काढत मात्र यावरून त्यांचा शासनाशी संघर्ष होत राहिला. निर्भिडपणे माधवरावांनी केलेल्या कार्याचा परिणाम व्हायचा तोच झाला त्यांना ‘हंटर’पत्र बंद करावे लागले. एवढेच नव्हे तर त्यांना हद्दपार व्हावे लागले. ‘हंटर’ बंद झाल्यानंतर, त्यांनी पुढे अखंड भारत बेळगावातून आघाडी व धडाडी अशी वृत्तपत्रे चालवली.

माधवरावांनी स्वतःच्या आणि इतर अनेक वृत्तपत्रातून आयुष्यभर विविध विषयावरती लिखाण केलं. तत्वांशी तडजोड न करता, आर्थिक मोहाला बळी न पडता आणि दहशतीला न घाबरता अगदी वृद्धापकाळात मध्ये सुद्धा ते लिहीत राहिले. गरिबांवरती अन्याय होऊ न देणं, समाजातील अनिष्ट प्रथा नष्ट व्हाव्यात, समतेचा आग्रह, बुवाबाजी, सामाजिक व धार्मिक सुधारणा, स्त्री-मुक्ती समाजवाद, राजकीय आणीबाणी, संयुक्त महाराष्ट्र सीमावाद अशा अनेक विषयांवरती ते लिहीत होते. त्यांचे प्रचंड प्रमाणात लिखाण आणि काम बघून एक ‘निर्भीड पत्रकार’ म्हणून माधवरावांचे कार्य किती मोठे होते याची आपल्याला कल्पना आहे.


अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *