धरणात कार बुडून चार जणांचा मृत्यू

पुणे: चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने पानशेतकडून पुण्याच्या दिशेने येणाऱ्या कार खडकवासला धरणाच्या बॅक वाटरमध्ये बुडाल्याची घटना आज संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास घडली. अपघातात एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाला आहे. यात तीन बहिणी आणि आईचा समावेश आहे. वडील या अपघातातून बचावले.
पानशेत पुणे रस्त्यावर कुरण फाट्याजवळ पानशेतकडून पुण्याकडे निघालेल्या सॅंट्रो कारच्या चालकाचे नियंत्रण सुटले. त्यामुळे कार थेट खडकवासला धरणात कोसळली. कारमधील अल्पना विठ्ठल भीकुले ४५ (रा वीर, सध्या रा. चव्हाऩगर धनकवडी पुणे,) त्यांची मुलगी प्राजक्ता (वय २१), प्रणिता (वय१७), वैदेही (वय ८) यांचा मृत्यू झाला. कारचालक विठ्ठल केशव भिकुले ( वय ४६ )हे यामध्ये वाचले आहेत.
अग्निशमन दलाकडून मृत्यूदेह बाहेर काढण्यात आले असून पुढील कारवाईसाठी पोलिसांकडे सुपूर्त करण्यात आले असल्याची माहिती पीएमआरडीएच्या नांदेड सिटी अग्निशमन केंद्राचे अधिकारी सुजित पाटील यांनी दिली