तब्बल १० वर्षाच्या लढ्यानंतर विद्यापीठाला मिळाले सावित्रीमाईंचे नाव, आज ७२ वा वर्धापन दिन
पुणे: स्त्रीशिक्षणासाठी आपले आयुष्य वेचणाऱ्या सावित्रीबाई फुलेंचे नाव पुणे विद्यापीठाला द्यावे यासाठी तब्बल १० वर्षे लढा द्यावा लागला. १० वर्षाच्या संघर्षानंतर भारतीय पहिल्या महिला शिक्षिका व मुख्याध्यापिका सावित्रीबाई फुले यांचे नाव पुणे विद्यापीठाला देण्यात आले.
पुणे विद्यापीठाचा नामविस्तार व्हावा यासाठी २००४ साला पासून नामांतर समिती आणि विविध पक्षांनी मागणी केली होती. पुणे विद्यापीठाचे नाव सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यासाठी सिनेट, व्यवस्थापन परिषदे बरोबर ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ नामकरण कृती समितीच्या माध्यामतून विशेष प्रयत्न करण्यात आले.
ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ नामकरण कृती समितीची स्थापना २१ ऑक्टोबर २०११ रोजी करण्यात आली. नोव्हेबर २०११ मध्ये समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय पुणे समोर आंदोलन करण्यात आले होते. १५ डिसेंबर २०११ रोजी कृती समितीतर्फे समता भूमी ते जिल्हाधिकारी कार्यालय असाही मोर्चा काढण्यात आला होता. पुन्हा एकदा जानेवारी २०१२ मध्ये समितीच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले मात्र त्यानंतरही कुठलेही पाऊल उचलण्यात आले नसल्याने १ मार्च २०१२ पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरु करण्यात आले होते. यानंतर तत्कालीन सार्वजनिक व बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांनी दिलेल्या आश्वासनानंतर समितीने हे आंदोलन मागे घेतले होते.
२६ ऑक्टोबर रोजी झालेल्या पुणे विद्यापीठाच्या, व्यवस्थापन परिषदेत नामविस्तारा संदर्भात स्थगन प्रस्ताव माडण्यात आल होता. नामविस्ताराचा प्रस्ताव एकमताने संमत करण्यात आला होता. अखेर फेब्रुवारी २०१४ मध्ये राज्यसरकारकडे अंतिम मान्यतेसाठी नामाविस्ताराचा प्रस्ताव पाठविण्यात आला. ७ जुलै २०१४ रोजी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ नावाला राज्य मंत्रीमंडळाची मान्यता मिळाली होती
तत्कालीन राज्यपाल के. शंकरनारायण यांच्या उपस्थितीत ९ ऑगस्ट २०१४ मध्ये अखेर पुणे विद्यापीठाचे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ असे नामांतर झाले. विद्यापीठाची मुख्य इमारत सर्वांचे लक्ष वेधून घेणारी आहे. ब्रिटिश काळात गव्हर्नर हाऊस म्हणून ही इमारत बांधली आहे. १८६४ ते १८६९ या दरम्यान निओ गॉथिक शैलीत हि इमारत बांधण्यात आली. तत्कालीन ब्रिटीश गव्हर्नर यांच्यासाठी पावसाळी सुट्यात राहण्यासाठी ही इमारत बांधण्यात आली होती. मलेशिअन कामगारांनी ही इमारत बांधली असून यात काही भारतीय कामगारांचा सुद्धा समावेश होता. बेसाल्ट दगडापासून ही इमारत बांधण्यात आली आहे. त्यावेळी सुमारे १८ लाख रुपये खर्च आला होता. या इमारतीच्या खर्चावरून ब्रिटनच्या संसदेत वाद झाल्याचे इतिहास अभ्यासक सांगतात. स्वातंत्र्यानंतर या इमारतीचे रुपांतर विद्यापीठात करण्यात आले.
१० फेब्रुवारी १९४९ रोजी पुणे विद्यापीठाची स्थापन झाली. डॉ. एम. आर. जयकर पहिले कुलगुरू होते. सुरुवातीला केवळ १८ महाविद्यालये विद्यापीठाशी सलग्न होती. आता ७०० पेक्षा अधिक महाविद्यालय विद्यापीठाशी सलग्न आहेत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा आज ७२ व्या वर्षापन दिन साजरा होत आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात उच्च शिक्षणासाठी देशभरातून मोठ्या प्रमाणात विद्यार्थी येतात. त्याचबरोबर ६० पेक्षा अधिक देशातून विद्यार्थी पदवी आणि पदवीओत्तर शिक्षणसाठी येत असतात. साधारण ४११ एकर च्या परिसरात हे विद्यापीठ वसले असून जवळपास विविध ५० विभाग आहेत. ललित केंद्रात गुरुकुल पद्धतीने नाटकाचे शिक्षण देण्यात येते.
महाराष्ट्रातच नव्हे तर देशाच्या शिक्षणाच्या दृष्टीने महत्वाचे केंद्र आहे. ७ लाखापेक्षा जास्त विद्यार्थी हे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात येतात. टाइम्स हायर एज्युकेशन या जागतिक नामांकणानुसार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ देशात ७ व्या क्रमांकावर आहे.
मराठीचा प्रचार आणि प्रसार आणि चांगली मनुष्यनिर्मिती या दृष्टीकोनातून पुणे विद्यापीठाची स्थापना करण्यात आली होती. कालानुरूप विविध बदल करण्यात आले आहेत.