माजी केंद्रीय मंत्री, माजी खासदार दिलीप गांधी यांचे निधन
दिल्ली: माजी केंद्रीय मंत्री दिलीप गांधी यांना एक दिवसापूर्वीच कोरोना झाल्याचे समोर आले होते. दिल्ली येथील खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली होती. तसेच हॉस्पिटलमधील वैद्यकीय अधिकाऱ्यांना विशेष लक्ष देण्याच्याही सूचना त्यांनी केल्या होत्या. दिलीप गांधी यांना कोरोना झाल्याने निदान झाल्याने त्यांच्या समर्थकांमध्ये अस्वस्थता पसरली होती. दरम्यान, अर्बन बँकेतील काही प्रकरणांमुळे गांधी चर्चेच्या केंद्रस्थानी होते. परंतु प्रकृतीमध्ये काही बदल झाल्यामुळे त्यांची प्राणज्योत मावळली आहे.
अर्बन बँक घोटाळ्यामुळे अडचणींमध्ये झाली होती वाढ
अर्बन बँकेतील चिल्लर आणि पिंपरी चिंचवड शाखेतील घोटाळ्यामुळे गांधी यांच्याभावती अडचणी वाढल्या होत्या. चिल्लर घोटाळ्यात नगरच्या आर्थिक गुन्हे शाखेने अर्बनमधील काही अधिकाऱ्यांना अटक केली. तर गांधी यांच्यासह माजी संचालकांना नोटिसी बजावल्या होत्या. यात फक्त एकाच संचालकाने नोटिसीला सकारात्मक प्रतिसाद देत चौकशीसाठी पोलिसांसमोर हजर राहिले. बाकीचे अजून समोर आलेले नाही. याशिवाय पिंपरी चिंचवड शाखेतील घोटाळ्यात पोलिसांनी चौकशीचा फास आवळला आहे. आतापर्यंत पाच जणांना बेड्या ठोकल्या आहेत.
तीन टर्म खासदार तर एकदा मंत्री
दिलीप गांधी हे तीन वेळा भाजपकडून खासदार म्हणून निवडून आले आहे तर अटल बिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात ते मंत्री देखील राहिले आहेत. त्यांनी अहमदनगर लोकसभा मतदार संघात मात्तबर असे राजीव जी राजळे, शिवाजीराव कर्डीले यांचा पराभव केला होता. अहमदनगर लोकसभा क्षेत्रातील विरोधकांच्या गटबाजीचा त्यांनी चांगलाच फायदा घेतला होता.