चिमुरडीवर बलात्कार प्रकरणात अवघ्या ५९ दिवसात फाशीची शिक्षा
नांदेड: नांदेड जिल्ह्यातील दिवशी गावात पाच वर्षीय मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याची घटना जानेवारी महिन्यात घडली होती. या घटनेनं नांदेड हादरून गेलं होतं. भोकर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका नदीजवळ ही घटना घडली. तपासानंतर आरोपीला अटक करण्यात आली होती. ३५ वर्षीय आरोपी हा त्याच मुलीच्या कुटुंबीयांच्या मालकीच्या शेतावर काम करत होता.
आरोपीने दुपारी मुलीला नदीजवळच्या परिसरात नेले. तिथे तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर तिचा गळा आवळून हत्या केली. मुलीच्या पित्याने तिला दुपारी दोन वाजताच्या सुमारास आरोपीसोबत बघितले होते. त्यानंतर पाच वाजता मुलगी कुठेही दिसली नाही. तिचा शोध घेऊनही ती सापडली नाही. अखेर पित्याने आणि कुटुंबीयांनी स्थानिक पोलीस ठाण्यात जाऊन मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली.
आरोपीस कठोरातील कठोर शिक्षा देण्यात यावी व हा खटला जलदगती न्यायालयात चालविण्यात यावा अशी मागणी विविध स्तरातून होत होती. विविध पक्ष, सामाजिक संघटना, महिला संघटनांनी यास्तव मोर्चे, धरणे, रास्ता रोकोसह आदी आंदोलने केली होती. तर, घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन भोकर उपविभागीय पोलीस अधिकारी गोपाळ रांजणकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विकास पाटील यांनी सखोल तपास करून अवघ्या १९ दिवसात या गुन्हाचे दोषारोपपत्र १० फेब्रुवारी २०२१ रोजी भोकर जिल्हा व अतिरीक्त सत्र न्यायालयात दाखल केले.
या गंभीर गुन्ह्याचा खटला भोकर जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयात चालविण्यात आला होता. १ मार्च २०२१ पासून न्यायालयात या खटल्याची तपासणी सुरू झाली. याबाबत आरोपी बाबुराव सांगेराव ऊर्फ बाबुराव माळेगावकर उकंडु विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी पोलीस निरीक्षक विकास पाटील यांनी तपास पूर्ण करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सरकारी पक्षातर्फे १५ साक्षीदार तपासण्यात आले. फिर्यादी, साक्षीदाराचे साक्ष पुरावे, वैद्यकीय पुरावा व आरोपीविरूद्ध सबळ पुरावे याआधारे आरोपी बाबुराव माळेगावकर यास फाशीची शिक्षा सुनावण्यात आली.
न्यायालयाच्या या ऐतिहासिक निकालानंतर दिवशी (बु.) मधील ग्रामस्थांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.