ठाण्या पाठोपाठ ‘या’ जिल्ह्यातही लॉकडाऊनचे संकेत
काल राज्यात ८ हजार ७४४ रुग्ण आढळले
पुणे: ठाणे जिल्ह्यात वाढत्या कोरोना बाधितांची संख्या लक्षात घेता ३१ क्षेत्रात लॉकडाऊन करण्यात आले. त्याच बरोबर नाशिक जिल्ह्यात सुद्धा वेळेचे बंधन लावण्यात आले आहे. सकाळी ७ ते संध्याकाळी ७ या वेळेतच दुकाने सुरु राहण्यास मुभा देण्यात आली आहे.
एकीकडे कोरोना प्रतिबंधात्मक लसीची मोहीम सुरु असतांना मोठ्या प्रमाणात कोरोना बाधित सापडणे चिंता वाढविणारी बाब आहे. विदर्भातील अमरावती, अकोला, वाशीम आदी जिह्यात बाधितांची संख्या वाढल्याने निर्बंध लावण्यात आले आहेत.
नाशिक जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. जीवनावश्यक वस्तू वगळता सकाळी ७ ते संध्याकाळी ७ अश्या पद्धतीने दुकाने उघडी राहणार आहे. तर शनिवारी-रविवारी संपूर्ण जिल्ह्यात लॉकडाऊन राहणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी दिली. तसेच विनाकारण घराबाहेर पडू नका असे आवाहन सुद्धा त्यांनी केले. काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे बैठक घेतली होती. त्यानंतर निर्बंध लावण्यात आले आहे. ९ मार्चच्या मध्यरात्री पासून याची अंमलबजावणी होणार आहे.
एकच महिन्यात उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या ४ हजाराने वाढली आहे. बाधित वाढल्याने निर्बंध लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यापूर्वीच रात्री ११ ते पहाटे ५ दरम्यान संचारबंदी लागू करण्यात आली आहे. राज्यात काल ८ हजार ७४४ बाधित आढळून आले. तर ९ हजार ६८ जण कोरोनामुक्त झाले. मागली तीन दिवस सलग १० हजार रुग्ण आढळून आले होते. बरे होण्याचे प्रमाण ९३.२१ टक्के आहे. मागील २४ तासात २२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.