वनमंत्री संजय राठोड विरोधात वानवडी पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात पोलिसांची बघ्याची भुमिका घेत असल्याचा भाजपचा आरोप
पुणे: पूजा चव्हाण आत्महत्या प्रकारात वनमंत्री संजय राठोड यांचे नाव समोर येत आहे. मात्र पोलीस बघ्याची भुमिका घेत असल्याचा आरोप करत भाजप पुणे शहर उपाध्यक्षा स्वरदा बापट यांनी वानवडी पोलीस ठाण्यात वनमंत्री संजय राठोड यांच्या विरोधात तक्रार अर्ज दिला आहेत. त्यात राठोड यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावी अशी मागणी केली आहे.
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात भाजप आक्रमक झाली आहे. गुरुवारी स्वरदा बापट यांनी वानवडी पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार अर्ज दिला आहे. पूजा चव्हाण या तरुणीने संजय राठोड यांच्याकडून होणाऱ्या मानसिक त्रासाला कंटाळून, त्यांच्याकडून होणाऱ्या दबाव व छळापोटी तिने आत्महत्या केल्याचे नमूद केले आहे. संजय राठोड यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. नुकतीच स्वरदा बापट यांची भाजप पुणे शहर उपाध्यक्षपदी निवड झाली आहे. संजय राठोड विरोधात भाजप आक्रमक झाली आहे. गुरुवारी सकाळी भाजप उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी सुद्धा वानवडी पोलीस ठाण्याला भेट देऊन पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणातील तपासाबाबत पोलिसांना जाब विचारला. अधिवेशनात याबाबत प्रश्न उपस्थित करणार असल्याचे सुतोवाच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे.