अखेर वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण भोवले
मुंबई: वनमंत्री संजय राठोड यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. पूजा चव्हाण या तरुणीच्या आत्महत्या प्रकरणात नाव आल्यानंतर राठोड यांना राजीनामा द्यावा लागला आहे. महाविकास आघाडीच्या सरकार मधील राजीनामा देणारे संजय राठोड पहिले मंत्री ठरले आहे. संजय राठोड हे यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री सुद्धा होते.
पुण्यात ७ फेब्रुवारीला वानवडी भागात पूजा चव्हाण या २२ वर्षीय तरुणीने तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली होती. त्यानंतर पूजा चव्हाण सोबत राहणाऱ्या अरुण राठोड या तरुणाचे संभाषण सोशल मिडीयावर मोठे व्हायरल झाल्यानंतर या प्रकरणाला खऱ्या अर्थाने तोंड फुटले. माध्यमांनी हे प्रकरण लावून धरल्यानंतर विरोधी पक्षाने यात लक्ष घालायला सुरुवात केली होती.
या प्रकरणात पूजा चव्हाण हिच्या कुटुंबियाच्या वतीने कुठलीही तक्रार नसल्याचे सांगण्यात आले. पूजा हिने कुकुटपालनासाठी बँकेकडून कर्ज घेतले होते त्यातूनच तिने आत्महत्या केली असल्याचे सांगण्यात आले होते. तसेच या प्रकरणाचा संबध मंत्री संजय राठोड यांच्याशी जोडण्यात आल्यानंतर पुजाची बदनामी थांबविण्याचे आवाहनही तिच्या कुटुंबियाच्या वतीने करण्यात आले होते. या दरम्यान पूजा सोबत राहणाऱ्या अरुणच्या घरी चोरी झाली होती.
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात १२ ऑडीओ क्लीप बाहेर आल्यानंतर भाजप आक्रमक झाली होती. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे पोलीस महासंचालक हेमंत नगराळे यांना निवेदन देऊन कारवाईची मागणी केली होते. भाजप उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी तर पूजा चव्हाण हिने उडी मारून आत्महत्या केली त्या इमारतीत जाऊन पाहणी केली होती. तसेच संबधित वानवडी पोलीस ठाण्याला भेट देऊन मंत्री संजय राठोड यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी केली होती.
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात नाव आल्यानंतर संजय राठोड हे १० दिवस नॉट रिचेबल होते. बंजारा समाजाची काशी म्हणून ओळखल्या जाणऱ्या पोहरादेवी येथे शक्ती प्रदर्शन करत आपल्या सोबत घाणेरडे राजकारण होत असल्याचा आरोप राठोड करतात. तसेच पोलिसांकडून तपास सुरु असून त्यानंतर सगळ स्पष्ट होईल असे सांगितले होते. भक्कम पुरावे असताना पुणे पोलिसांनी संजय राठोड यांच्यावर राजकीय दबावापोटी कारवाई करत नसल्याचा आरोप विरोधी पक्षाने वेळोवेळी केला होता. भाजप युवा मोर्चाच्या वतीने संजय राठोड यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली होती.