अखेर सचिन वाझे यांची बदली
मनसुख हिरेन प्रकरण भोवणार
मुंबई: मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस अधिकारी यांनी सचिन वाझे यांचे नाव घेत मोठी खळबळ उडवून दिली होती. त्यानंतर दोन्ही सभागृहात विरोधी पक्षाकडून वाझे यांचे निलंबन करून अटक करण्याची मागणी करण्यात येत आहे. याबाबत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझे यांना क्राइम ब्रांच मधून हलविण्याची मोठी घोषणा केली आहे.
हिरेन यांच्या पत्नीने पोलीस अधिकारी सचिन वाझे यांनीच पतीचा खून केल्याचा आरोप केला आहे. पोलिसांना दिलेला जबाब विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी सभागृहात वाचून दाखवला होता. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यात चर्चा झाली होती. यात सचिन वाझे यांची बदली करण्याचा निर्णय झाल्याच सांगण्यात आले होते. मात्र तो मागे घेण्यात आला.
बुधवारी सकाळी राष्ट्रावादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची फोनवरून चर्चा झाली आणि सचिन वाझे यांची बदलीचा निर्णय घेण्यात आला. याबाबत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विधानपरिषदेत निवेदन दिले आहे. गुन्हे शाखेत असणारे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांची बदली करण्याचा निर्णय घेण्यात असून या प्रकरणाची चौकशी निष्पक्ष होणार असल्याचे सांगितले.
सचिन वाझे यांचे बदलीचे निवेदन साजरे करतांना सभागृहात गोंधळ उडाला होता. विरोधी पक्षाने ही कारवाई पुरेशी नसून निलंबनाची कारवाई करावी अशी मागणी केली आहे.