विकास दुबे एन्काऊंटर प्रकरणी उत्तर प्रदेश पोलिसांना अखेर क्लीन चिट

लखनऊ : कानपूरच्या बिकरू गावात ८ पोलिसांच्या हत्येमुळे चर्चेत आलेल्या गँगस्टर विकास दुबेच्या एन्काऊंटरप्रकरणी उत्तर प्रदेश पोलिसांना अखेर क्लीन चिट देण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाने स्थापन केलेल्या न्यायमूर्ती बी.एस. चौहान समितीने आपल्या अहवालात यूपी पोलिसांना क्लीन चीट दिली आहे. आठ महिन्यांच्या तपासणीनंतर समितीला कोणताही साक्षीदार सापडला नाही, पोलिसांनी एन्काऊंटर जाणीवपूर्वक केल्याचा किंवा फेक एन्काऊंटर असल्याचे तपासातून स्पष्ट झालेले नाही, असे समितीने सांगितल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.
तपासादरम्यान न्यायमूर्ती बी.एस. चौहान यांनी अनेक पोलिसांकडे चौकशी केली. मात्र, एन्काऊंटर बनावट असल्याचे सिद्ध करण्यासाठी समितीला एकही सबळ पुरावा मिळाला नाही. पुराव्याअभावी विकास दुबे एन्काऊंटर प्रकरणात पोलिसांना क्लीन चिट देण्यात आली आहे.
२ जुलै २०२० च्या रात्री विकास दुबे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी चौबेपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत बिकेरू गावी गेलेल्या पोलीस पथकावर अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात ८ पोलीस शहीद झाले. यानंतर पोलिसांनी कारवाईत त्याच्या चार कार्यकर्त्यांना ठार मारले. परंतु, मुख्य आरोपी विकास दुबे फरार झाला. ९ जुलै रोजी विकास दुबे नाट्यमयरित्या उज्जैनच्या महाकाळ मंदिरात शरण आला. यानंतर उज्जैनहून परत येत असताना पोलिसांची गाडी पलटी झाली, त्यानंतर विकास दुबेने पोलिसांचे पिस्तूल घेऊन पळ काढला. पोलीस त्याचा पाठलाग करत असताना त्याने पोलिसांवरच गोळीबार केला. त्यामुळे पोलिसांनी त्याच्यावर गोळीबार केला आणि चकमकीत विकास दुबेचा मृत्यू झाला. अखेर न्यायालयीन चौकशीतही हा एन्काऊंटर योग्य मानला गेला आहे.