“कामाठीपुऱ्यातील प्रत्येक घरात तिचा फोटो आहे…लोकं तिच्या पुतळ्याची पूजा करतात..”
सध्या गंगुबाई कोठेवाली हे नाव पुन्हा एकदा चर्चेत आले आले आहे. निमित्त आहे संजय लीला भन्साळींचा येणारा आगामी चित्रपट ‘गंगूबाई काठिवाडी’. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर आला असून त्यात आलिया भट मुख्य भूमिकेत दिसणार आहे. संजय लीला भन्साळी यांनी हुसेन झैदींच्या ‘माफिया क्वीन्स ऑफ मुंबई’ पुस्तकाच्या आधारित आपला चित्रपट चित्रित केला आहे. थोडक्यात हा चित्रपट मुंबईच्या कुख्यात रेड लाईट एरिया असलेल्या कामाठीपुरा येथील वेश्यालयातील गंगुबाईच्या जीवनावर आधारित आहे.
कामाठीपुऱ्याची सम्राज्ञी असणारी ही ‘गंगूबाई कोठेवाली’ नक्की कोण होती? अजूनही त्या भागातील प्रत्येक स्त्रीच्या घरात गंगुबाईचा फोटो हमखास दिसतोच, कामाठीपुऱ्यात तिचा पुतळा देखील आहे त्या पुतळ्याची तेथील लोकं आजही पूजा करतात. आता तुम्हाला प्रश्न पडेल ही गंगुबाई वैशाव्यवसाय असणाऱ्या भागात एवढी प्रसिध्द कशी काय होती आणि आजही आहे? तर आज आपण त्याबाबतीत जाणून घेणार आहोत.
गंगुबाई मुळची गुजरातमधील काठीयावाडी मधील होती. तिचे लहानपणापासूनचे स्वप्न होते अभिनेत्री व्हायचं. वडील वकील असल्यामुळे घरातले वातावरणही कडक होते. मात्र काहीही करुन अभिनेत्री बनायचेच असे स्वप्न गंगा उराशी बाळगून होती. तिच्या वडिलांच्या हाताखाली कारकूनीचे काम करणाऱ्यावर वयाच्या सोळाव्या वर्षी ती प्रेमात पडली आणि त्याच प्रियकराबरोबर ती मुंबईला पळून गेली. मात्र मुंबईला आल्यावर वास्तव मात्र वेगळंच असल्याची जाणीव तिला झाली मात्र तेंव्हा वेळ निघून गेली होती. प्रेमाच्या आणाभाका घेतलेल्या प्रियकरानेच तिचा विश्वासघात केला. अवघ्या ५०० रुपयांसाठी त्याने गंगा ला एका कोठेवालीला विकलं.
नवऱ्याच्या या विश्वासघाताने गंगा पूर्णपणे कोसळली. घरी जाणे योग्य नव्हते आणि मुंबईत कुणी ओळखीचे नव्हते त्यामुळे तिला वेशाव्यवसायाशिवाय पर्याय नाहीं हे तिने मान्य केले आणि उपजीविकासाठी हा मार्ग निवडला. हळूहळू गंगू लोकप्रिय होत चालली होती. मानसिकरित्या खमकी होत चालली होती. तिला कळून चुकलं कि आता या जगात टिकून राहायचं असेल तर ताकदीने लढावे लागेल. लोकांच्या मनावर ती राज्य करू लागली. तिने श्रीमंत ग्राहक मिळवून भरपूर पैसा कमवला. तिचा पेहराव देखील अगदी एखाद्या राणीला शोभेल असा असायचा. सोन्याचं कामकाज असणारं ब्लाउज, सोन्याचा काठ असलेली पांढरीशुभ्र साडी, सोन्याचे दागिने, विशेष म्हणजे तिचा एक दात सोन्याचा होता. महागडी कार असं एकंदरीत तिचा शाही कारभार असायचा.
तिच्या श्रीमंत ग्राहकांपैकी अनेक मोठाली गुंड तिचे ग्राहक होते. याच दरम्यान तिच्या सोबत एक घटना घडली. त्याकाळी मुंबईत पठाण गँगची दहशत असायची. त्या गँग चा बॉस म्हणजेच करीम लाला हा होता. त्या गँग मधला एक पठाण गंगूकडे यायचा आणि तिच्यावर अत्याचार करायचा. तो अत्याचार इतका भीषण होता की एकदा गंगूला दहा दिवस हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करावं लागलं होतं. पण पठाण गँगच्याविरोधात जायची कुणाची हिंमत नव्हती. पण या अत्याचाराबाबत गंगू ने तडक करीम लाला ची भेट घेतली. “तुमच्याच गटातला एक माणूस माझ्यावर वारंवार अत्याचार करतोय, त्याला संपवा आणि मला न्याय द्या, ह्या उपकारापायी मी तुमची आयुष्यभर वेश्या बनून राहिल.” हे एकूण करीम लाला चमकला. “मला माझं कुटुंब आहे, पोरं -बाळ आहेत. मला तू तुझा भाऊ मान इथून पुढे कुणीही तुझ्यावर अत्याचार करणार नाहीं याची हमी मी देतो.” हे लाला चे उत्तर ऐकून गंगू बावरली. आत्तापर्यंत आयुष्यात आलेले सर्व पुरुषांमुळे असलेलं तिचं मत बदललं आणि तिने आदराने करीम लाला ला राखी बांधली. करीम लालानेदेखील जाहीर केले की, आज पासून गंगुबाई माझी बहीण आहे तिच्यावर कोणीही अत्याचार कराल तर खबरदार “.
तेव्हापासून गंगुबाईचे दिवस बदलले. आणि ती कामाठीपुरा येथील अनेक वैशा व्यवसाय गृहांची ती मालकीण बनली. त्या भागामध्ये तिने तिचे वजन प्रस्थापित केले. तिचे त्या भागातील वर्चस्व वरचेवर वाढतच गेले. आणि याचा उपयोग तिने स्थानिक समस्या सोडवण्यात केला. अनेक महिला तिच्याकडे समस्या घेऊन यायच्या आणि गंगुबाई त्या समस्या सोडवायची. असंही म्हटलं जातं की गंगुबाईने कुठल्याही मुलीला तिच्या परवानगीशिवाय वेश्याव्यवसायात ढकललं नाही. उलट वेश्याव्यवसायात असणाऱ्या महिलांच्या आरोग्य संदर्भात, तसेच त्यांची मुलं इत्यादींसाठी मोठं काम केलं आहे. १९६० मध्ये एक घटना अशी घडली कि, गंगुबाई सर्व मुंबईला माहिती झाली. कामाठीपुर्यातली वेश्याव्यवसायवस्ती जवळ असणाऱ्यांना शाळेचा प्रश्न निर्माण झाला होता. शाळेजवळच ही वस्ती असल्यामुळे मुलांवर वाईट परिणाम होतील, म्हणून ती वस्ती तिथून हलवावी असं काही लोकांनी मागणी केली होती आणि पुढे जाऊन हा वाद इतक्या विकोपाला गेला होता कि तिला पंडित नेहरुंची भेट घ्यावी लागली होती. गंगुबाई आणि वस्तीमधील इतरांनी आम्ही स्थलांतरित होणार नाही अशी ठाम भूमिका घेतली होती. या निमित्ताने तिने आझाद मैदानावरून भाषण देखील केलं होतं आणि ते दुसऱ्या दिवशी बातमीपत्रात छापून आलं होतं. त्यामुळे लोकही तिच्याकडे आदराने पाहू लागले होते. ती आयुष्यभर वेश्यांच्या हक्क आणि अधिकार यांसाठी लढली. दलाल लोकं, राजकारणी यांना देखील ती घाबरत नसायची त्यामुळे तिची वेगळीच ताकद तेथील भागात असायची.