लस घेऊन सुद्धा पाकिस्तानच्या पंतप्रधानांना कोरोनाची लागण
लाहोर : पाकिस्तानच्या आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार देशात आतापर्यंत ६ लाख २३ हजार १३५ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर, मागील २४ तासांमध्ये ४० जणांचा कोरोनामुळं मृत्यू झाला आहे. देशात कोरोनातून ५ लाखांहून अधिक रुग्ण बरेही झाले आहेत. ज्यामुळं देशातील संसर्गाचा वेग वाढून ९.४ टक्क्यांवर पोहोचला आहे. ही आकडेवारी पाहता नागरिकांच्या सतर्कतेनच कोरोना नियंत्रणात आणला जाऊ शकतो हे स्पष्ट होत आहे.
पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांनी कोरोनाची लस घेतली होती. याशिवाय त्यांनी लस घेतल्यानंतर कोरोनाची वाढती रुग्णसंख्या पाहता यासाठी आखून दिलेल्या नियमांचं पालन करावं असा आग्रहसुद्धा केला होता. पाकिस्तानच्या पंतप्रधान कार्यालयानं ट्विटरच्या माध्यमातून यासंदर्भातील माहिती दिली होती. लस घेण्याच्या एका दिवसानंतर लगेचच त्यांना कोरोनाची लागण झाल्याची बाब समोर आली आहे. साइनोफार्म कोविड १९ या लसीची पहिली मात्रा त्यांना गुरुवारी देण्यात आली होती. पण, तरीही दुसऱ्याच दिवशी ते कोरोनाबाधित असल्याची बाब समोर आली. आपण कोरोनाबाधित असल्याचं लक्षात येताच खान यांनी गृह विलगीकरणात राहण्याचा निर्णय घेतल्याची माहिती तेथील आरोग्यमंत्र्यांनी दिली.
"Pakistan PM Imran Khan (in file photo) tests positive for COVID-19 and is self isolating at home," tweets Special Assistant to the Prime Minister on National Health Services, Regulations & Coordination. pic.twitter.com/et9Q2nxuCi
— ANI (@ANI) March 20, 2021
पाकिस्तानात कोरोना आटोक्यात येत नसल्याने, अनेक ठिकाणी लॉकडाऊन करण्यात येत आहे. जवळपास ७ शहरात नव्याने लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. इथे शाळा-कॉलेजसह सर्व व्यवहार बंद करण्यता आले आहेत. रमजानचा महिना तोंडावर असल्याने, पाकिस्तानातील बाजारांमध्ये गर्दी वाढण्याची चिन्हं आहेत. त्यामुळे अशा परिस्थितीत इम्रान खान सरकार काय निर्णय घेतं याकडे सर्वांचं लक्ष आहे.
चीनची लस
इम्रान खान यांनी चीनची कोरोना लस सिनोफार्म (Chinese vaccine Sinopharm) टोचून घेतली होती. कोरोना लसीसाठी पाकिस्तान चीनवर अवलंबून असून आता चीनची लस घेतल्यानंतरच खान यांना कोरोनाची लागण झाल्याने चीनची कोरोना लस सेफ आहे का? याबाबत शंकाकुशंका उपस्थित केल्या जात आहेत.
कोवॅक्स लसही मिळण्याची आशा
दरम्यान, पाकिस्तानला चीनशिवाय जागतिक आरोग्य संघटनेची (WHO) कोवॅक्स (Covax) ही लसही मिळण्याची आशा आहे. Who कडून गरिब आणि कमी उत्पन्न असलेल्या राष्ट्रांना ही लस पुरवण्यात येत आहे. यानुसार पाकिस्तानला १ कोटी ७१ लाख ६० हजार डोस मिळणार आहेत. सध्या पाकिस्तानातही ६० वर्षावरील ज्येष्ठ नागरिक आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यात येत आहे.