कोरोनाच्या उद्रेकाला निवडणूक आयोग जबाबदार; हत्येचा गुन्हा दाखल व्हायला हवा

चेन्नई : कोरोना काळात निवडणुका घेणाऱ्या निवडणूक आयोगाला मद्रास उच्च न्यायालयाने चांगलेच फटकारले आहे. देश कोरोनाशी लढत असतांना राजकीय पक्षांना मोर्चा घेण्यास परवानगी दिल्याबद्दल मद्रास उच्च न्यायालयाने भारतीय निवडणूक आयोगावर टीका केली आहे. तसेच, निवडणूक आयोग कोरोनाच्या लाटेला जबाबदार असून, आयोगाच्या अधिकाऱ्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे अस म्हणत न्यायालयाने संताप व्यक्त केला आहे.
मद्रास उच्च न्यायालयात सुरु असलेल्या सुनावणी दरम्यान राजकीय पक्षांना प्रचारसभा घेण्यासाठी परवानगी कशी दिली जाते? असा प्रश्न उपस्थित केला. तसेच, देशातील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला तुम्हीच जबाबदार आहात, तुमच्या अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल व्हायला हवा. अस म्हणत निवडणूक आयोगाला चांगलेच फटकारले आहे. न्यायालयाच्या आदेशानंतरही निवडणूक प्रचारसभामध्ये कोरोना प्रतिबंधात्मक नियमांची पायमल्ली केली असल्याचे दिसून आले असल्याने न्यायालयाने नाराजी व्यक्त केली आहे.
मुख्य न्यायाधीश संजीब बॅनर्जी आणि न्यायाधीश सेन्थिलकुमार रामामूर्ती यांच्या खंडपीठासमोर करुर मतदारसंघात मतमोजणी दरम्यान कोविड-१९ प्रोटोकॉल सुनिश्चित करण्यासाठी पुरेशी सुविधा उपलब्ध आहे कि नाही? या विषयावर चिंता व्यक्त करणाऱ्या याचिकेवर सुनावणी सुरु होती. या ठिकाणी सुमारे ७७ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत.