आसामला भूकंपाचा धक्का, उत्तर बंगाल आणि बिहारलाही फटका!

नवी दिल्ली : आज सकाळी ७.५१ वाजण्याच्या सुमारास रिश्टर स्केलवर ६.४ मॅग्निट्यूड तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्याने आसाम आणि उत्तर बंगालचा काही भाग हादरला आहे. यामुळे पहाटे साखरझोपेत असणाऱ्या आसामला मोठा धक्का बसला आहे. मेघालयातही काही ठिकाणी भूकंपाचे धक्के जाणवल्याची माहिती समोर आली आहे. पण आसाममध्ये या हादऱ्याची तीव्रता सर्वाधिक होती.
भूकंपाचा प्रभाव बिहार आणि उत्तर बंगालमध्येही जाणवला. दार्जिलिंगमध्येही लोक आपापल्या घरातून बाहेर पडले. तसंच बिहारच्या अनेक जिल्ह्यांतही सकाळी ७.५५ मिनिटांनी भूकंपाचे धक्के जाणवले. मुंगेर, कटिहार, किशनगंज, भागलपूर, पूर्णिया, खगडिया यांसहीत अनेक भागांत लोकांना भूकंपाचा धक्का सहज जाणवला. नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजीच्या (National Center for Seismology) माहितीनुसार भूकंपाचा केंद्रबिंदू हा राज्यातील सोनीतपूरमध्ये होता. १७ कि.मी. परिसरात भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. काही अहवालांनुसार याठिकाणी तेजपूर परिसरात देखील धक्के जाणवले. आसाममध्ये झालेल्या भूकंपाचे एकूण तीन हादरे जाणवले. पहिला ६.४ मॅग्निट्यूड, दुसरा ४.३ आणि तिसरा ४.४ मॅग्निट्यूडचा होता.
भूकंपानंतर या भागातले बरेच व्हिडीओ आणि फोटो वायरल झाले आहेत यावरून झालेल्या नुकसानीचा अंदाज येऊ शकतो. गुवाहाटीमध्ये भूकंपानंतर अनेक ठिकाणी वीज गायब झाली होती. भूकंपाच्या तीव्र झटक्यामुळे अनेक भागात भिंती कोसळल्या आहेत. त्याच बरोबर अनेक ठिकाणी झाडेही कोसळली आहेत. भूकंपामुळे बरेच नुकसान झाल्याची माहिती आहे. या घटनेनंतर परिसरात एकच गोंधळ झाला होता. अनेक इमारतींच्या भींतींना मोठे तडे गेल्याचंही चित्र पाहायला मिळतं आहे.
१९५० मध्ये आसामध्ये सर्वात मोठा भूकंप झाला होता. हा भूकंप ८.५ रिश्टर स्केल तीव्रतेचा होता. त्यानंतरचा सर्वात मोठा भूकंप आज २८ एप्रिल २०२१ रोजी आसामने अनुभवला आहे.