कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे शनिशिंगणापूर देवस्थानने घेतला मोठा निर्णय
अहमदनगर: जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. कोरोना रुग्णांच्या वाढीमुळे शनिशिंगणापूर येथील शनिमंदिर शुक्रवारी व शनिवारी बंद ठेवण्यात येणार आहे. त्याचबरोबर अमावस्या यात्रा रद्द करण्यात आलेली आहे. अमावस्या यात्रा रद्द करण्यात आल्याची माहिती शनैश्वर देवस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष भागवत बानकर व कार्यकारी अधिकारी नितीन शेटे यांनी दिली. याबाबत देवस्थानचे अध्यक्ष भागवत बानकर यांनी पत्रक देखील प्रसिद्ध केले आहे. शिंगणापूर येथे शनी अमावस्याला देशभरातून लाखो भाविक दर्शनासाठी येत असतात.
सध्या कोरोनाचा संसर्ग वाढत असल्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून शनि अमावस्या यात्रा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शुक्रवारी दुपारी तीन वाजता शनी मंदिर दर्शनासाठी बंद असणार आहे. शनिवारी देखील दिवसभर दर्शन बंद राहिल. रविवारी १४ मार्च पासून दर्शन व्यवस्था पुन्हा पूर्ववत सुरू होईल .नेवाशाचे तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांनी शनिवारी जमावबंदी लागू केली आहे. ग्रामस्थांनी व भाविकांनी आदेशाचे पालन करण्याचे आवाहन सहायक निरीक्षक सचिन बागुल यांनी केले आहे .
शनी अमावास्येच महत्व
हिंदू धर्मात फाल्गुन महिन्यात येणाऱ्या अमावस्येचं खास महत्व आहे. जर ही अमावस्या शनिवारच्या दिवशी येत असेल तर याचं महत्त्व आणखीचं वाढून जातं. हा अमावस्या शनिवारच्या दिवशी येत असल्याने याला याला शनैश्चरी अमावस्या म्हटलं जातं. यावेळी शनैश्चरी अमावस्या १३ मार्च २०२१ रोजी येत आहे आणि त्यादिवशी शनिवार आहे. यामुळे या वर्षीच्या शनि अमावस्येला विशेष महत्व प्राप्त झालेले आहे. परंतु कोरोनामुळे आता भाविकांना अमावस्येच्या दिवशी दर्शन घेता येणार नाही.