डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३० वी जयंती; कॉंग्रेसकडून रक्तदान शिबिराचे आयोजन

मुंबई: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज १३० वी जयंती आहे. कोरोना प्रादुर्भाव असल्याने यंदाही गर्दी न करता घरातूनच बाबासाहेबांना अभिवादन करावं असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केल आहे. दरवर्षी दादरच्या चैत्यभूमीवर न येता घरातूनच जयंती साजरी करण्याच आवाहन करण्यात आहे. त्यासाठी पोलिसांचा मोठा फौजफाटा चैत्यभूमी परिसरात लावण्यात आला आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी सकाळी १०.५५ वाजता अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवर जाणार आहे. मुख्यमंत्री सुद्धा अभिवादनाला येणार आहे.
आंबेडकर जयंतीदिनी बाबासाहेब यांच्या चैत्यभूमी येथील स्मारकाचे थेट प्रक्षेपणाद्वारे दर्शन घेण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. त्याबरोबर बीआयटी चाळ आणि इंदुमील या ठिकाणच्या कार्यक्रमांचे थेट प्रक्षेपण सोशल मीडियाद्वारे होणार आहे.
रक्तदान करून कॉंग्रेसचे बाबासाहेबांना अभिवादन
सध्या देशावर कोरोनाचे सावट आहे. हे पाहता महाराष्ट्र कॉंग्रेसने रक्तदान करून बाबासाहेबांना अभिवादन करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईतील चेंबूर मध्ये कॉंग्रेसतर्फे राज्यव्यापी रक्तदान शिबीर आयोजन करण्यात आले आहे. राज्यसभेचे विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे आणि कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या हस्ते या रक्तदान शिबिराचे उद्घाटन होणार आहे. यानंतर देशातील आणि राज्यातील नेते व्हर्चुअल सभा घेणार आहेत. याचे सुद्धा थेट प्रक्षेपण सोशल मिडियावरून करण्यात येणार आहे.
घरातून अभिवादन करण्याचे आवाहन
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३० वी जयंती उत्साहात आणि प्रथा परंपरेनुसार पुर्ण सन्मानाने साजरी केली जावी. मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी घरातूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केल जावं अस आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केल आहे. ते आज चैत्यभूमी येथे अभिवादनाला जाणार आहेत.