शिवभोजन थाळी नेमकी किती जणांपर्यंत पोहोचते, याबाबत साशंकता – चंद्रकांत पाटील

पुणे : संचारबंदी व अन्य कडक निर्बंध असल्याने अनेकांच्या रोजीरोटीचा प्रश्न गंभीर बनला आहे. सरकारकडून अशा लोकांना कोणताही दिलासा दिला गेलेला नाही. शिवभोजन थाळी नेमकी किती जणांपर्यंत पोहोचते, याबाबत साशंकता आहे. पण या गरजू लोकांना दोन वेळचे अन्न, दूध, फळे, औषधे व मास्क पुरविण्याचे हे स्वयंसेवी संस्थांचे व दानशूरांचे काम कौतुकास्पद आहे. लॉकडाऊन झालाच, तर दानशूरांनी पुढे येऊन अशा कम्युनिटी किचन्सची उभारणी करावी.” अशी मागणी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली.
चंद्रकांत पाटील म्हणाले, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत आरोग्य व्यवस्थेची स्थिती गंभीर आहे. तितकीच गंभीर परिस्थिती दिव्यांग, गरजू व हातावरचे पोट असणाऱ्या लोकांचीही आहे. अशा लोकांच्या पोटात दोन घास जावेत, या सामाजिक भावनेतून दानशूर व्यक्ती व संस्था चालवत असलेले कम्युनिटी किचन्स अतिशय उपयुक्त असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
मॉडर्न महाविद्यालयात उभारलेल्या कम्युनिटी किचनला बुधवारी चंद्रकांत पाटील यांनी भेट देऊन पाहणी केली. त्यावेळी चंद्रकांत पाटील माध्यमांशी बोलत होते.
या ‘अन्नसुरक्षा’ उपक्रमांतर्गत लालबत्ती परिसरातील गरजूंना शुक्रवार पेठ पोलीस चौकीजवळ अन्नदान व लहान मुलांसाठी दुधवाटप होत आहे. वाहतूक शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त संजय शिंदे यांनी याठिकाणी भेट दिली. काही लाभार्थ्यांना त्यांच्या हस्ते शिधावाटप करण्यात आले. कोरोनाच्या या कठीण काळात सामाजिक संस्थांकडून गरजूना केली जाणारी मदत उल्लेखनीय आहे, अशा शब्दात संजय शिंदे यांनी या उपक्रमाचे कौतुक केले.
दिव्यांग इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज (डिकाई) पुणे यांच्या पुढाकारातून उद्योजक दानेश शहा परिवाराच्या सहयोगाने व प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी पुणे आणि मुकुल माधव फाउंडेशन यांच्या सहकार्याने अन्नसुरक्षा विमा (फूड इन्शुरन्स) योजनेअंतर्गत प्रायोगिक तत्वावर दिव्यांग, गरीब व गरजू व्यक्तींना फूड पॅकेट्स, रोगप्रतिकार शक्तीवर्धक औषधे, मास्क आदी जीवनावश्यक वस्तू पुरवण्याचा उपक्रम राबविण्यात येत आहे.