लॉकडाऊन हा शब्द वापरू नका, आरोग्यमंत्री राजेश टोपेंचं आवाहन !

मुंबई: कोरोना साखळी तोडण्यासाठी राज्य सरकारने कडक निर्बंध लादले आहेत. मात्र या निर्बंधांमुळे अर्थचक्राला धक्का बसल्याने राज्यभरातून अनेक घटक सरकारच्या या निर्णयाला विरोध करत आहेत. या पार्श्वभूमीवर सरकार लागू केलेल्या निर्बंधांमध्ये काही शिथिलता आणणार का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत याबाबत भाष्य केलं आहे.
‘दुकाने बंद आहेत हे मान्य आहे, पण जीव वाचवण्याला प्राधान्य देण्यात येत आहे. निर्बंधांमध्ये काही प्रमाणात शिथिलता देता येईल का यावर मंत्रिमंडळात विचार करू. निर्बंध कडक केले आहेत, लॉकडाऊन केलेलं नाही,’ असं स्पष्टीकरण राजेश टोपे यांनी दिलं आहे. तसंच या कठीण काळात कुणीही राजकारण करू नये, भाजपनेही सहकार्य करावं, अशी विनंती टोपे यांनी केली आहे.
राजेश टोपे यांच्या पत्रकार परिषदेतील ठळक मुद्दे:
- जर ४० लाख लस उपलब्ध झाल्या नाहीत तर तीन दिवसात लसीकरण बंद होईल
- आजाराचा स्ट्रेन बदलला आहे का अशी शंका आहे. याबाबत केंद्राला कळवलं आहे नमुने दिले आहेत
- वय २० ते ४० या गटाला लस द्या अशी मागणी केंद्र सरकारला केली
- महाराष्ट्रात १२०० मेट्रिक टन ऑक्सिजन तयार होतो तो सर्व आता रुग्णांसाठी ठेवला.
- इतर राज्यातून ऑक्सिजनची मागणी केली
- खाजगी डॉक्टर यांनी रेमडीसिव्हीरचा वापर केवळ निर्देशानुसार करावा
- केवळ बिल वाढावे म्हणून रेमडीसिव्हीर वापरलं जात आहे, त्यावर कारवाई करण्यात येणार
- रेमडीसिव्हीर ११०० ते १४०० रुपयांपर्यंतच्या किमतीतच विकावे
- हे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार
माध्यमांशी संवाद साधताना आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी लॉकडाऊन हा शब्द वापरू नका असं आवाहनही केलं. केवळ शनिवारी आणि रविवारी लॉकडाऊन आहे. बाकीच्या दिवशी फक्त निर्बंध आहेत असंही त्यांनी स्पष्ट केलं. “गरज लागल्यास ऑक्सिजनचं प्रमाण इंडस्ट्रीसाठी शून्य करुन टाकू, ऑक्सिजनचा लागणारे स्टीलचे प्लांट बंद ठेवू पण ऑक्सिजन कमी पडू देणार नाही.” असं राजेश टोपे यांनी यावेळी सांगितलं. थोडी जरी लक्षणं जाणवली तर लगेच चाचणी करुन घ्या. अंगावर दुखणं काढू नका, असं आवाहनही आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जनतेला यावेळी केलं.